Published On : Wed, Jul 25th, 2018

मराठा मोर्चाकडून मुंबई बंद मागे

Advertisement

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेलं आंदोलन तीव्र झालं असून, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यावरून सकल मराठा समाजाने सुरू असलेला बंद मागे घेतला असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकल मराठा समाजाच्यावतीने मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी ही घोषणा केली. मुंबई, ठाण्यात आणि नवी मुंबईत पुकारण्यात आलेला बंद यशस्वी झाला आहे. या बंदवेळी पोलिसांनीही आम्हाला चांगलं सहकार्य केलं.

बंदमुळे लोकांना अधिक त्रास होऊ नये म्हणून मुंबईतील बंद स्थगित करण्यात येत आहे, असं सांगतानाच नवी मुंबई आणि ठाण्यातील बंद मागे घेण्याचं आव्हानही पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं. यावेळी बंदमुळे लोकांना झालेल्या त्रासाबद्दल सकल मराठा समाजाने जाहीर दिलगिरीही व्यक्त केली.

आजचा बंद शांततेत सुरू होता. मात्र काही लोकांनी राजकीय हेतूने हा बंद पेटवल्याचा संशयही त्यांनी व्यक्त करतानाच आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केलं. आजच्या बंदमुळे उद्देश साध्य झाला नाही. मूक मोर्चामध्ये जी शक्ती आहे, ती अशा आंदोलनामध्ये नसते, असं पवार म्हणाले.

मराठा समाजावर दोन वर्ष अन्याय झाला आहे. दोन वर्ष सरकारने सरकारचा अपमान केला. मराठा समाजाची दोन वर्ष फसवणूक करण्यात आली. त्यामुळे मूक नव्हे ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला.

आत्मबलिदान करण्यापर्यंत कार्यकर्ते गेल्याने हा बंद पुकारण्यात आला होता, असं सांगतानाच आम्ही शांतताप्रिय लोक आहोत. लोकांचे संरक्षण करणारे लोक आहोत. पण या सरकारने आमच्या हातात दगड दिले आणि काठ्या दिल्या, अशी टीका पवार यांनी यावेळी केली