Published On : Wed, Feb 14th, 2018

“मॅग्नेटिक महाराष्ट्र- कन्व्हर्जन्स २०१८” जागतिक गुंतवणूक परिषद यशस्वी होईल – मुख्यमंत्री

Advertisement

मुंबई: महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर आहे आणि राहिलच. उद्योजकांमुळेच महाराष्ट्र समृद्ध आहे. उद्योजकांच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे “मॅग्नेटिक महाराष्ट्र- कन्व्हर्जन्स २०१८” ही जागतिक गुंतवणूक परिषद यशस्वी होईलच, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. मुंबईत १८ फेब्रुवारीपासून “मॅग्नेटिक महाराष्ट्र- कन्व्हर्जन्स २०१८” या तीन दिवसीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जागतिक गुंतवणुकीचे उद्घाटन होणार आहे. या जागतिक गुंतवणूक परिषदेच्या अनुषंगाने उद्योजक तसेच विविध देशांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.

या परिषदेच्या पार्श्वभुमीवर शासनाचे मुखपत्र असलेल्या “महाराष्ट्र अहेड” या इंग्रजी नियतकालिकाच्या विशेषांकाचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित या विशेषांकाचे उद्योग मंत्री श्री. देसाई अतिथी संपादक आहेत.

कार्यक्रमास देश तसेच राज्यातील आघाडीचे उद्योजक, उद्योजक संघटनांचे पदाधिकारी आदी तसेच विविध देशांच्या दुतावासांतील उच्चाधिकारी, शासनाच्या विविध विभागांचे सचिव, अधिकारी आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मेक-इन-इंडिया या जागतिक गुंतवणूक परिषदेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली. याच यशामुळे उद्योग विभागाने स्वतःची म्हणून ही गुंतवणूक परिषद आयोजित करण्याची संकल्पना आखली. भारतात येणाऱ्या परकिय गुंतवणुकीपैकी पन्नास टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येते. उद्योजकांमुळेच महाराष्ट्र समृद्ध बनला आहे. उद्योजकांच्या या गुंतवणुकीला आणखी चालना देण्याचे धोरण आखण्यात येत आहे. त्याचदृष्टीने विशेष आर्थिक क्षेत्राच्या व्याख्येत अडकलेल्या जमिनी मुक्त करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक जमिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. जागतिक स्तरावरूनही राज्यात उद्योग उभारणीसाठी जमिनीची मोठी मागणी आहे. ती या नव्या धोरणामुळे पूर्ण करता येणार आहे. ज्यामुळे गुंतवणूकही वाढेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल.

राज्याच्या औद्योगिक धोरणात नवनव्या संकल्पनांचा अंगिकार केला जात असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जागतिकस्तरावरून येणाऱ्या नव-नव्या संकल्पनाचा स्वीकारणे, ग्लोबल-सप्लाय-चेनशी सुसंगतता राखण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच वस्त्रोद्योग, फोर-प्वाईंट-ओ, आर्टिफीशीयल इंटेलजिन्सचे धोरणही स्वीकारले आहे. त्यामुळेच महाराष्ट्र उद्योजकांसाठी हॅाट डेस्टीनेशन ठरले आहे. महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणुकीच्याबाबतीत अग्रेसर आहे आणि राहील. त्या अनुषंगाने आयोजित मॅग्नेटीक महाराष्ट्र ही गुंतवणूक परिषद यशस्वी होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सुरुवातीला प्रास्ताविकात उद्योग मंत्री श्री.देसाई म्हणाले, महाराष्ट्राने उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. त्यातूनच उद्योगविषयक विविध धोरणांची निश्चिती करण्यात आली आहे. यातील अनेक धोरणांबाबत महाराष्ट्र हे असे धोरण आखणारे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. एकात्मिक उद्योग क्षेत्र- इंटिग्रेटेड इंडस्ट्री एरिया या धोरणामुळे अनेक विकसक पुढे येतील. यातून उपलब्ध होणाऱ्या संधीमुळे देशातील, तसेच विदेशातील उद्योग आणि गुंतवणूकदार महाराष्ट्रात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“महाराष्ट्र अहेड” च्या या विशेषाकांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष मुलाखतीसह, महाराष्ट्राच्या उद्योगविषयक विविध धोरणांचीही माहिती समाविष्ट आहे.