Published On : Thu, Jul 16th, 2020

म.न.पा. अधिकारी व कर्मचा-यांचे लेखणी बंद आंदोलन मागे

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचा-यांनी सोमवारी (१३ जुलै) पुकारलेले लेखणी बंद आंदोलन मंगळवारी (१४ जुलै) मागे घेतले. आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी अधिकारी व मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यां समवेत चर्चा करुन लेखणी बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. महापौर श्री.संदीप जोशी यांनी देखील सोमवारी याबाबत अधिका-यांच्या शिष्टमंडळाला आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात याबाबत झालेल्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त महेश मोरोणे, मिलींद मेश्राम, डॉ.प्रदीप दासरवार, अमोल चौरपगार, प्रमुख लेखा तथा वित्त अधिकारी हेमंत ठाकरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांच्यासह सर्व सहा.आयुक्त व कार्यकारी अभियंता तसेच राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे, सचिव संजय मोहले व कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे आदी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त श्री. तुकाराम मुंढे म्हणाले की, नगररचना विभागाच्या सहायक संचालकांसंदर्भात झालेली घटना दुर्देवी आहे. अधिकारी आणि पदाधिका-यांसंदर्भात आचारसंहिता असावी व त्याचे पालन व्हावे अशी मागणी शासनाकडे पत्राद्वारे केली आहे. सद्या कोरोनाच्या या संकटकाळात सर्वांना शहराच्या हितासाठी काम करायचे आहे. त्यामुळे जबाबदारीने आणि सामंजस्याने आपले कर्तव्य बजावावे व कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिका शहराच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने कार्य करते त्यामुळे येथे काम करणा-या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-यांचे दायित्व हे शहराप्रती आणि नागरिकांप्रती आहे. आपले प्राधान्य हे शहराच्या हिताच्या दृष्टीने कार्य करणे हे आहे. अतिरिक्त आयुक्त श्री.राम जोशी यांनी सांगितले की, सदर घटनेनंतर अधिकारी व कर्मचा-यांचे शिष्टमंडळ महापौरांकडे गेले असता त्यांनीही संपूर्ण प्रकार चूकीचा असून त्यासंदर्भात सदस्यांच्या वतीने स्वत: माफी मागितली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचा-यांनी समन्वयाची भूमिका घेऊन आंदोलन मागे घेणे उचित असल्याचे सांगितले.