Published On : Sat, Aug 19th, 2017

पाच रुपयात लंचबॉक्स

नागपूर : सामान्य, गरजू लोकांसाठी शिवसेनेने एक रुपयात झुनका भाकर ही योजना सत्तेत असताना राबविली होती. त्याच धर्तीवर नागपुरात आता पाच रुपयात लंचबॉक्स या उपक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे. परंतु हा उपक्रम खास रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आहे. शहरात धंतोली, रामदासपेठ हा परिसर हेल्थ हब झाला आहे. राज्याच्या बाहेरूनही येथे मोठ्या संख्येने रुग्ण येत आहे. बरेचदा पैशाच्या अभावी त्यांचे नातेवाईक पोटाला चिमटा देतात.

अशांना पाच रुपयात तीन चपात्या आणि भाजी हा लंचबॉक्स मिळाल्यास मोठा आधार होणार आहे.

ही संकल्पना नगरसेवक संदीप जोशी यांची आहे. युवा झेप प्रतिष्ठान हा उपक्रम राबविणार आहे. धंतोली आणि रामदासपेठ या परिसरात लहानमोठी जवळपास ३०० रुग्णालये आहेत. येथे उपचार करणाºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या उपक्रमाला धंतोली परिसरातून सुरुवात होणार आहे.

संचालन जरी संस्था करीत असली तरी, सामाजिक भान जपणाºया नागपूरकरांच्या माध्यमातूनच उपक्रमाला बळ मिळणार आहे. त्यासाठी शहरातील २०० हून अधिक प्रतिष्ठित नागरिकांचा सर्वे केला आहे.

त्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. धंतोलीतील गोरक्षण येथे या उपक्रमाचे काऊंटर राहणार आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये या योजनेची प्रसिद्धी करणार आहे. डॉक्टरांना उपक्रमासंदर्भात पत्र देणार आहे. बचतगटाकडून अन्न बनवून घेणार आहे. सुरुवातीला दुपारी १२ ते २ या वेळेत हे काऊंटर सुरू राहणार आहे. पुढे उपक्रमाला प्रतिसाद मिळाल्यास रात्री सुद्धा हा उपक्रम सुरू करण्यात येईल.


आपणही लावू शकता हातभार
गेल्यावर्षी माझ्या वाढदिवसाला ७०० च्या वर बुके आले होते. पुढे ते डस्टबिनमध्ये गेले. त्यामुळे यावर्षी माझ्या वाढदिवसाला कुठलाही केक, बुके न आणता या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमात माझ्या जवळचीच मंडळी नाही, तर समाजभान जपणारे नागपूरकर सुद्धा सहभागी होऊ शकतात. सहकार्याच्या रुपात लंचबॉक्ससाठी लागणारा शिधा देऊ शकतात. एका वेळेचा मासिक लंचबॉक्सचा खर्च ६०० रुपये येतो. त्यासाठी १२ महिन्याचे धनादेश देऊ शकता. आवडत्या व्यक्तीचे जन्मदिवस, दिवंगत व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ योगदान देऊ शकता. आपल्या मदतीमुळे गरीब रुग्णांच्या दु:खात बुडालेल्या नातेवाईकांना प्रेमाचे दोन घास मिळणार आहे. त्याच माध्यमातून नागपूरकरांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडणार आहे.