मुंबई : महाराष्ट्रात येत्या लोकसभा निवडणुकीनिमित्त महायुतीत अद्यापही जागावाटप निश्चित झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एकूण १६ जागा मिळणार असल्याची माहिती आहे. या १६ जागांमध्ये मुंबईतल्या ३ जागांचा समावेश आहे. त्यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मतदारसंघाचा समावेश आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी यासंदर्भात माहिती दिली.
जागावाटपावरून महायुतीत कोणतेही मतभेद नाही. २०१९ च्या निवडणुकीत युतीने ४२ जागा जिंकल्या होत्या यंदा हा रेकॉर्ड आम्हाला मोडायचा आहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यात आम्ही सर्व जागा जिंकणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंना पुत्राला मुख्यमंत्री बनवायचे होते-
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याची घाई उद्धव ठाकरेंना झाली होती. मात्र आदित्य मुख्यमंत्री बनण्यात माझा अडथळा होता असे त्यांना वाटायचे. त्यामुळे माझ्या नगरविकास खात्यात कायम आदित्य ठाकरे हस्तक्षेप करायचे. मला कुठलीही माहिती न देता ते नगरविकास खात्याची, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसीची बैठक लावायचे. महाविकास आघाडी सरकार असताना माझ्याकडून नगरविकास खाते काढून घ्यायचं प्लॅनिंग उद्धव ठाकरे करत होते. इतकेच नाही तर नक्षलांकडून मला धमकी आलेली असतानाही त्यांनी माझी सुरक्षा वाढवण्यास नकार दिला असा आरोपही एकनाथ शिंदेंनी केला.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होत होते, तेव्हा मला मुख्यमंत्री बनवलं जाईल या अपेक्षेने माझा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. परंतु त्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे नाव सुचवल्याचं मला सांगण्यात आले. शिवसेनेकडून काही माणसं उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस घेऊन मला भेटले. त्यांनीच मला उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यास सांगितले, असा गौप्यस्फोटही शिंदे यांनी मुलाखतीदरम्यान केला.