नागपूर : काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. नागपुरातील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विकास ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
विकास ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार,काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
नागपूर लोकसभा मतदारसंघात यंदा काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
भाजपाच्या नितीन गडकरी यांच्यासमोर काँग्रेसने विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवले आहे. धडाकेबाज नेता अशी नागपुरात ओळख असलेल्या विकास ठाकरे यांचा जनसंपर्कही तगडा आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने माझ्यावर विश्वास दाखवला हे मी माझं भाग्य समजतो.आता विकासाच्या मुद्द्यावर प्रचार सुरू होईल. लोकसभेची निवडणूक ही विचारधारेची लढाई आहे. नागपूरची जनता आपल्या पाठीशी असल्याचा विश्वासही विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.










