Published On : Wed, May 27th, 2020

टोळधाड : कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यात काही भागातील पिकावर टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सूचनेनुसार शेतात धुर करणे, ड्रम वाजवून आवाज करणे व शेवटी फवारणी करणे सुरु केलेले असून शेतकऱ्यांनी जागरुक रहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. फवारणी शक्यतोवर रात्री उशीरा किंवा पहाटेच्या वेळी करावी, या वेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झालेले असतात. त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळणे शक्य होते, असे कृषी विभागाने कळविले आहे.

नागपुर विभागात जि. वर्धा येथिल आष्टी तालुका व जि. नागपुर येथिल काटोल तालुक्यात टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळुन आलेला आहे. काटोल तालुक्यातील फेटरी, खानगाव शिवारासह आमनेर गांदी या परिसरातही टोळ आढळुन आली आहे. ही कीड तीच्या मार्गातील सर्वप्रकारच्या हिरव्या पानांवर हल्ला करुन संपवून टाकते. ह्या किटकांच्या थव्याची व्याप्ती १० किलोमीटर लांब व २ किलोमीटर रुंद इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. या किडीचे थवे ताशी १२ ते १६ किलोमीटर इतक्या वेगाने उडतात. ही टोळधाड दिवसभर हवेच्या दिशेने उडत जातात, जातांना दिसेल त्या हिरव्या पानांचा फडशा पाडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान संभवते. सद्यस्थितीत काटोल नरखेड तालुक्यात संत्रा पिकावर या किडीने आक्रमण केले असून झाडांचे शेंडे खाऊन टाकलेले दिसत आहे. कृषी विभागाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी शेतात धुर करणे, ड्रम वाजवून आवाज करणे व शेवटी फवारणी करणे सुरु केलेले आहे.

सदर किडीच्या सामुहिक नियंत्रणासाठी ट्रक्टर ऑपरेटेड स्प्रेयर व अग्निशमन दलाच्या बंबांनी क्लारोपायरीफॉस ८० लिटर किटकनाशकाची फवारणी काटोल परिसरात करण्यात आली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फ क्षेत्रिय भेटी देण्यात येत असून शेतकऱ्यांना जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही एक महत्वाची कीड असून जेव्हा ही कीड समुहाने आढळून येते तेव्हा ही कीड मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. वाळवंटी टोळ आपली अंडी ओल्या रेतीमध्ये १० ते १५ सेमी आत समुहाने घालतात. एक मादी साधारणतः १५० ते २०० अंडी घालते, अंडी सर्वसाधारणपणे १० ते १२ दिवसात उबवतात. पिल्ल अवस्था २२ दिवसात पुर्ण होते. प्रौढ अवस्था लांब पर्यंत उडून नुकसान करते.

Advertisement

शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून खालीलप्रमाणे वेगवेगळया उपाययोजना कराव्यात. शेताच्या आजुबाजुला मोठे चर खोदणे तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करणे, संध्याकाळी-रात्रीच्या वेळी झाडाझुडपांवर टोळ जमा होतात अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळुन धूर केल्यास नियंत्रण होते.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निबोळी आधारित किटकनाशक अझाडिरेक्टिन १५०० पीपीएम ३० मिली किंवा ५ टक्के निंबोळी अर्काची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. २० किलो गहु किंवा भाताच्या तुसामध्ये फिप्रोनिल ५ एससी ३ मिली मिसळावे व त्याचे दिग शेतात ठिकठिकाणी ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात व सदर आमिषामुळे ही कोड मरण पावते.

मिथिल पॅराथिऑन २ टक्के भुकटी २५ ते ३० किलो प्रति हेक्टर धुरळणी करावी. टोळांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास पुढील किटकनाशकांची फवारणी करावी. क्लोरोपायरीफॉस २० ईसी २४ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस ५० ईसी १० मिली किंवा डेल्टामेधिन २.८ ईसी १० मिली किंवा फिप्रोनिल ५ एससी २.५ मिली किंवा ल्यांबडासायहेलोधिन ५ ईसी १० मिली किंवा मेलाथिऑन ५० ईसी ३७ मिली प्रती १० ल्टिर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.