Published On : Fri, Jan 24th, 2020

लिबर्टी चौकाजवळील फ्लायओव्हर ठरतोय जीवघेणा

वाहनांच्या यू-टर्नमुळे अपघाताचा धोका वाढला

नागपूर: नागपुरात लिबर्टी चौक ते मानकापूर आणि छावनी भागाला जोडण्यासाठी प्रशासनाकडून नवीन उड्डाणपूल बनविण्यात आला. तो अलीकडेच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला असला तरी त्याच्या दोषपूर्ण रचनेमुळे वाहनचालकांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. सध्या एलआयसी चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे कामठीकडे जाणारे वाहनचालक खालून यू-टर्न घेण्याऐवजी पुलावरून ‘यू-टर्न’ घेत आहेत. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. दुचाकी वाहनचालकांसोबतच आता चारचाकी वाहन चालकही चक्क पुलावरून धोकादायक वळण घेत आहे. अशावेळी एखादे भरधाव वाहन या वाहनावर धडकल्यास मोठा अपघात होऊ शकतो. याचे गांभीर्य दाखविणारा व्हिडिओ नागपूर टूडेच्या प्रतिनिधीने शूट केला आहे. उड्डाणपुलावरून ‘यू-टर्न’ घेणे ही वाहतूक नियमांची पायमल्लीसुद्धा आहे. लिबर्टी चौकावजवळील नवनिर्मित उड्डाण पुलामुळे वाहतूक समस्या मार्गी लागली. मात्र, याच्या दोषपूर्ण रचनेमुळे पुलावर अपघाताची शक्यता वाढली आहे. काही वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार एसआयसी चौकाकडे जाण्यासाठी प्रशासनाने नवीन मार्ग बनविण्याची गरज आहे.