नागपूर: योग ही सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व सर्वश्रुत आहे. योगाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्य करण्यात आले आहे. आपणही या विश्वाचे कल्याण करण्यासाठी योगप्रसार करूया, असे महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.
यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान आला. ‘योगा ऍट होम अँड योगा विथ फॅमिली’ अशी यावर्षीच्या योग दिनाची थीम होती. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने यंदा सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन न करता घरी, छतावर, अंगणात, कार्यालयात योग करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने नागपूरचे प्रथम नागरिक महापौर संदीप जोशी यांनी स्वतःच्या घरी कुटुंबासोबत योगाभ्यास केला.
यावेळी बोलताना त्यांनी नागपूरकरांना सहाव्या योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग या विषयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविले. योग हीच सुखी आणि सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे स्वतः योग करा, इतरांनाही प्रेरित करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
