Published On : Wed, May 12th, 2021

तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी सज्ज होऊया…! : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

मनपा-आय.एम.ए. ची परिचर्चा : तिसऱ्या लाटेत बालकांना लागण होण्याची शक्यता

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना अधिक प्रमाणात लागण होण्याची शक्यता आरोग्य संघटनेने वर्तविली आहे. असे झाले तर तो काळ सर्वाधिक आव्हानात्मक असेल. कारण लहान मुलांना लागण झाली तर त्यांच्या विलगीकरणात पालकांना सोबत राहावे लागेल. ह्या साऱ्या शक्यतांचा विचार करून पुढील नियोजन करावे लागेल. इंडियन मेडिकल असोशिएशनने या कार्यासाठी पुढाकार घ्यावा, मनपा त्यासाठी संपूर्ण सहकार्य करेल, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी कशा प्रकारे तयारी करता येईल, त्याचे नियोजन कसे करावे यासाठी सूचना घेण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. १२) ऑनलाईन परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिचर्चेत सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य सभापती संजय महाजन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, आय.एम.ए.चे सदस्य डॉ. मंजुषा गिरी, डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. विजय धोटे, डॉ. संदीप अंजनकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. विनोद गांधी, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. राऊत यांच्यासह अनेक बालरोग तज्ज्ञ सहभागी झाले होते.

आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात बाधीत झाले होते. दुसऱ्या लाटेत तरुण पिढीला लागण झाली. दरम्यान या दोन्ही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लसीकरण न झालेल्या बालकांना बाधा होण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी शहरातील बालरोग तज्ज्ञांच्या मदतीने तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी नियोजन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाच्या व्यवस्थेचीही तयारी ठेवावी लागेल, असे ते म्हणाले.

डॉ. मंजुषा गिरी म्हणाल्या, लहान मुलांना बाधा झाली की त्यांच्या विलगीकरणाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे वयोगट १ ते ५, वयोगट ६ ते १० आणि १० ते १८ अशा दृष्टीने वर्गीकरण करुन त्यादृष्टीने नियोजन करावे लागेल. डॉ. प्रशांत निखाडे यांनी कोव्हिडनंतर तयार होणाऱ्या काळ्या बुरशीवर प्रकाश टाकला. काळी बुरशी काय आहे, त्यामुळे काय त्रास होऊ शकतो, ते कसे थांबविता येईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. मास्क हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. काळी बुरशी झाली तर त्यावरील उपचाराचा खर्च न परवडण्यासारखा आहे. त्यामुळे त्याचा शरीरात शिरकाव होऊ नये, यासाठीच काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. संदीप अंजनकर म्हणाले, काळ्याबुरशीमुळे डोळा काढण्याची वेळ येऊ शकते. मात्र लवकर निदान करून उपचार केल्यास त्यापासून वाचता येईल. डॉ. विनोद गांधी म्हणाले, बालकांमधील गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करणारे तज्ज्ञ नागपुरात नाही. यासाठी तशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. मोठ्यांवर जे उपचार होतात तेच लहानांनाही लागू पडतील का, याबाबतही अभ्यास करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. डॉ. पंकज अग्रवाल तसेच अन्य बालरोग तज्ज्ञांनीही यावेळी नियोजनासंदर्भात सूचना केल्या. सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनीही यावेळी काही सूचना मांडल्या.

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आतापासूनच तयारी आणि नियोजन करावे लागेल. यासाठी आय.एम.ए.ने पुढाकार घ्यावा. नागपूर महानगरपालिका पूर्णपणे सहकार्य करून त्याचे व्यवस्थापन करेल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिला.