Published On : Mon, Jan 8th, 2018

औद्योगिक लीजच्या जागा सार्वत्रिक उपयोगात आणा

Advertisement

कन्हान : शहरातील बंद पडलेल्या औद्योगिक कंपनीच्या जागा शासकीय लिजवर आहे. त्या जागेची कायदेशीर चौकशी करून या जागा सार्वत्रिक उपयोगा करिता शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी जनहितार्थ मागणी कन्हान दुकानदार महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मागील कित्येक वर्षापासून कन्हान शहरातील औद्योगिक उद्योगसमूह, व्यवसाय बंद पडलेले असुन औद्योगिक कंपनीच्या जागा ओसाड झाल्या आहे.अनेक निवेदन देऊनही यावर आजपर्यंत कुठलाच तोडगा काढण्यात आला नाही. सरकार मुकदर्शकांच्या भुमिकेवर ठाम असल्याने येथील कामगार व व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. यावर मात करून कामगार जिवन जगण्यासाठी धडपड करित आहे. दिवसेंदिवस वाढत्या बेरोजगारी मुळे युवक वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारीच्या मार्गाकडे वळताना दिसत आहे. हेच सामाजिक असमतोलाच्या समस्यांचे मुख्य केंद्रबिंदु बनलेले आहे.

सर्वच कंपन्या ब्रिटीश कालीन असल्यामुळे सर्व औद्योगिक मालकांनी शासकीय जमिनी लीजवर घेतल्या होत्या आणि आतापर्यंत लीजवरच आहे. यात कानपुर केमिकल्स (मालीकचंद ग्रुप) ब्रुक बॉन्ड लि. मी. (हिंदुस्थान लिव्हर ) दि इंडीयन हयुम पाईप (बालचंद हिराचंद ग्रुप ) खण्डेलवाल फेरोअलॉय, विदर्भ पेपर मिल अश्या नामंकित विविध औद्योगिक कंपन्या बंद पडुन ओसाड झालेल्या आहेत. त्या काळात सी.पी. एण्ड बेरारच्या राज्यात मध्यप्रदेशाची राजधानी नागपूर होती. कालांतराने नागपूर जिल्हा महाराष्ट्रात आल्यामुळे व जबलपूर मध्यप्रदेशाचे मुख्यालय झाल्याने संपुर्ण शासकीय कागदपत्रे व शासकीय रेकॉर्ड जबलपूरला जमा झाले. परंतु कानपुर केमिकल्सचे मालकानी परस्पर त्या ठिकाणी संबध जोडुन शासकीय कागदपत्राची हेरफेर करून कंपनीची जागा आपल्या नावाने सरकारी रेकॉर्डला करून घेतली.

कानपुर केमिकल्स कंपनी बंद पडल्यानंतर त्याचे मालक कृष्णकुमार अग्रवाल अँण्ड ब्रदर्सने कंपनीच्या जागेवर औद्योगिक एन ए असताना प्लॉटस टाकुन रहिवासीकरिता नागरिकांना विकुन टाकली. यामध्ये दुय्यम निबंधक पारशिवनी व मुद्रांक विक्रेत्यांना हाताशी धरून औद्योगिक शासकीय लीजवरील जमिनीची प्लॉटस टाकुन विक्री केली. व त्यावर काही लोकांनी घरे सुध्दा बांधली आहे. म्हणजेच कंपनीची जागा लीजवर असुन सुध्दा मालक कृष्णकुमार अग्रवाल यांनी औद्योगिक जागा रहिवासी प्लॉटस विकुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासनाची दिशाभुल तर केलीच व गरीब नागरिकांची फसवणुक केली आहे.

सन १९८४ मध्ये कन्हान शहरातील महामार्गावरील ६० फुटाचे अतिक्रमणे तोडल्यावर तत्कालीन तहसिलदारांनी ग्राम पंचायतीच्या बाजूला असलेल्या शासकीय जागेवर छोटया दुकानदारांना दुकानाकरिता पट्टे वाटप केलेले होते. दिवसेंदिवस वाढलेल्या लोक संख्येने कन्हान ग्राम पचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होऊन चार वर्षे होऊन सुध्दा कन्हान शहरात आठवडी व गुजरी बाजाराकरिता जागा उपलब्ध नसल्याने बाजार महामार्गावर लागत असतो. येथे मार्केट यार्ड, बस स्थानक, पोलीस वसाहत, अग्निशमन, हॉकर्स झोन आदी सार्वत्रिक लोक विकासा करिता शासकीय जागेची कमतरता भासत आहे.कन्हान पर्यंत येणा-या मेट्रो रेल्वेकरिता महामार्गाच्या चार पदरी निर्माण काम ३६ मिटर म्हणजेच ११४ फुट रूदीकरणाचे काम झपाट्याने सुरू असल्यामुळे महामार्गावरील भाजीपाला विक्रेता, फळे विक्रेता, हाथठेला, चाय, पान टपरी व छोटे दुकानदार उदवस्त होऊन त्यांच्या परिवारावर उपासमारीची टांगती तलवार दिसु लागली आहे.

यास्तव कन्हान शहरातील कानपुर केमिकल्स, ब्रुक ब्रॉण्ड लि.मी.(हिंदुस्थान लिव्हर ), विदर्भ पेपर मिल,या बंद अवस्थेत कंपन्याच्या ओसाड पडलेल्या तसेच इंडियन हयुम पाईप व बी के सी पी स्कुलच्या लीजच्या जागेची कायदेशीर चौकसी करून खरच शासकीय जागेवर अतिक्रमणे आढळल्यास शासनाने या जागा ताब्यात घेऊन त्या जागेवर आठवडी व गुजरी बाजार, मार्केट यार्ड, बस स्थानक, पोलीस वसाहत, अग्निशमन, हॉकर्स झोन, क्रिंडागण, आदी सार्वत्रिक लोक विकासा करिता जागा उपलब्ध करून शासकीय दराने गरीब स्थानिक छोटया दुकानदाराना दयाव्या जेणे करून शासनाला उत्पन्न मिळुन नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने व्यवसाय सुरू होऊन आर्थिक सोय होऊन परिवारवर उपासमारीची वेळ येणार नाही.

अशी मागणी मा. सचिन कुर्वे जिल्हाधिकारी नागपूर हयाना कन्हान कांद्री दुकानदार महासंघाच्या वतीने करण्यात आली. शिष्टमंडळात अध्यक्ष अकरम कुरेशी, उपाध्यक्ष श्यामबाबु पिपलवार, सचिव प्रशांत बाजीराव मसार, किशोर बेलसरे, सचिन गजभिये, दिपक तिवाडे, नामदेव तडस, प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते. तर दुकानदार नितीन रंगारी, मंजु सुरकार, प्रभाकर अमृतकर, रतिराम मेहरकुळे, जितु पाली, छोटु राणे, सुरेश भिवगडे, मोरेश्वर भोयर, विजय खडसे, दिपक तिवाडे, अरविंद देशमुख, रामभाऊ इंगोले, सतीश पाली, रहीम शेख, प्रफुल्ल सोलंकी, हरिष टेलर्स, दिलीप चौधरी, विजय पाली, अशोक उमराये, प्रमोद माहोरे, पंकज डांगे, धर्मराज धोपटे, चंद्रशेखर कळमदार, रवींद्र कोतपल्लीवार, राकेश मेश्राम, अनिल पाटील, अब्दुल लतीफ शेख, भोला सिंह, सुभाष यादव, श्रीकृष्ण जामोदकर, विनायक हिवसे, नथुजी चरडे, दिलीप वांढरे, प्रभाकर कावळे, प्रज्वल राऊत, अशोक मोरपाना आदीने सर्व दुकानदाराच्या वतीने न्यायीक मागणी केली आहे.