Published On : Tue, Sep 10th, 2019

त्रिमूर्तीनगर येथील अग्निशमन केंद्र व ‘तेजस्विनी बस’चे लोकार्पण

नागपूर: आज शहराचा चौफेर विकास होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. केवळ सिमेंट रस्ते आणि उड्डाण पूल यामुळेच नाही तर शहराच्या शास्वत विकासासाठी दोन्ही नेते कार्य करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन केंद्र व महिलांच्या सुविधेसाठी ‘तेजस्विनी’ इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक बस प्रदूषणमुक्तीच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल असून शास्वत विकासातून प्रदूषण मुक्तीकडे नागपूर शहराची महत्वपूर्ण वाटचाल सुरू झाली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ३६ अंतर्गत त्रिमूर्तीनगर जलकुंभजवळ रिंग रोड, भामटी येथे उभारण्यात आलेल्या त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्राचे तसेच खास महिलांच्या सुविधेसाठी मनपाच्या परिवहन ताफ्यात दाखल होणा-या इलेक्ट्रिकवरील ‘तेजस्विनी बस’ सेवेचे मंगळवारी (ता.१०) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

त्रिमूर्तीनगर जलकुंभजवळील अग्निशमन केंद्राच्या परिसरात आयोजित समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून

सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अभिजीत बांगर, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, अग्निशमन समिती सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, अग्निशमन समिती उपसभापती निशांत गांधी, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, परिवहन समिती सदस्या रुपाली ठाकुर, विशाखा बांते, सदस्य राजेश घोडपागे, नागेश मानकर, नगरसेविका मिनाक्षी तेलगोटे, नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, नगरसेविका वनिता दांडेकर, नगरसेविका भारती बुंडे, नगरसेवक लहुकुमार बेहते, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, वाढते प्रदूषण लक्षात घेता येत्या २०३० पर्यंत पेट्रोल, डिझेलवरील वाहने पूर्णपणे बंद होतील. त्यामुळे सर्व वाहने सीएनजी वर चालविले जातील. भविष्यातील ही समस्या पाहता नागपूर महानगरपालिकेने ‘तेजस्विनी’ इलेक्ट्रिक बससह शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारली आहेत, हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

याशिवाय नागरिकांना आपत्कालीन सेवा देण्यासाठी शहरात अग्निशमन केंद्र उभारण्यात आली आहेत. याच श्रृंखलेत त्रिमूर्ती नगर येथे अद्ययावत अग्निशमन केंद्र उभारण्यात आले आहे. नागरिकांना चोवीस तास सेवा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्रालगतच १२ निवासी सदनिका तयार करण्यात आल्या आहेत याचा नागरिकांना निश्चितच फायदा होईल. मात्र आज शहरात अग्निशमन केंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे अद्ययावत अग्निशमन केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी मनपातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

प्रास्ताविकात अग्निशमन समिती सभापती अॅड. संजयकुमार बालपांडे यांनी केंद्राबाबत विस्तृत माहिती दिली. शहर स्मार्ट होत असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट यंत्रणा लक्षात घेऊनच त्रिमूर्ती नगर येथे अद्ययावत अग्निशमन केंद्र तयार करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तात्काळ सेवा मिळावी यासाठी अग्निशमन अधिकारी व कर्मचा-यांसाठी केंद्रातच सदनिका बांधण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनीही ‘तेजस्विनी’ इलेक्ट्रिक बसची संकल्पना स्पष्ट केली. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचविणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या व्हिजनमधूनच परिवहन समितीतर्फे कार्य केले जात आहेत. शहरातील प्रत्येक घटकाला सेवा पोहोचविताना महिलांच्या सुरक्षा आणि सुविधेसाठी ‘तेजस्विनी’ इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येत आहे. शहरातीलजनतेला दर्जेदार सेवा प्रदान करणे हे मनपाचे कर्तव्य आहे. शहर प्रदूषण मुक्त व्हावे यासाठी पुढील वर्षापर्यंत नागपूर शहरात १०० इलेक्ट्रिक बस सेवा देतील. याशिवाय वर्षभरात मनपाच्या परिवहन सेवेतील सर्व ४२७ बसेसचे सीएनजी मध्ये परिवर्तन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी ‘तेजस्विनी’ बसचे लोकार्पण केले व त्रिमूर्ती नगर येथे अद्ययावत अग्निशमन केंद्राच्या शिलान्यासाचे अनावरण केले.

यावेळी त्रिमूर्ती नगर येथे अद्ययावत अग्निशमन केंद्र तयार करणारे मे. पार्थ कन्स्ट्रक्शनचे देवेंद्र पखडाल कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, उपअभियंता धनंजय मेंडूलकर, श्री. निंबेकार, मे. कोराले कन्सलटंटचे श्री. लडी, आर्की. सचिन कुकडे यांच्यासह ‘तेजस्विनी’ इलेक्ट्रिक बस तयार करणारे ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लि.चे सीईओ आनंद स्वरूप, हंसा ट्रॅव्हलचे आदीत्य छाजेड, लकडगंज बस आगारचे कंत्राटदार आनंद पचपोर यांचा महापौर व मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्रिमूर्ती नगर येथे अद्ययावत अग्निशमन केंद्रामध्ये बांधण्यात आलेल्या सदनिकेच्या किल्ल्या अग्निशमन विभागाचे भाग्यवान वाघ व अनिल बालपांडे यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे संचालन अग्निशमन समिती उपसभापती निशांत गांधी यांनी केले तर आभार मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी मानले.