विधीमंडळामार्फत पर्यावरण समिती आणि हवामान संसद सुरु करावी – आमदार हेमंत टकले यांची मागणी


नागपूर: निसर्गाचे लहरीपण वाढायला लागले असून राज्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळ पर्यावरणाशी निगडीत सर्वच विषय हाताळण्याइतके सक्षम नाही. वाढत्या शहरीकरणामुळे महानगराचे असंख्य प्रश्न उभे राहिले आहेत. पर्यावरणाशी निगडीत असलेल्या विषयांचे गांभीर्य लक्षात घेवून विधिमंडळामार्फत एक पर्यावरण समिती स्थापन करावी आणि त्यातून एक कृती कार्यक्रम तयार करावा तसेच हवामान संसदही सुरु करावी अशी मागणी विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले यांनी केली.

हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे विषय २१ व्या शतकात महत्त्वाचे झाले आहेत. या विषयावर विधानपरिषदेत नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा आमदार हेमंत टकले यांनी उपस्थित केली.

निसर्गाचा संहार करण्याची प्रवृत्तीच आता मानवात वाढायला लागली की काय अशी खंत आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली. जंगल आणि जंगलातील प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आपण काय करणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. निसर्गाचे लहरीपण आता वाढायला लागले आहे. पाऊस अनियमित झाला आहे.

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल पुन्हा साधण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं. हवामान बदलाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने वैज्ञानिक पद्धतीने कामाची आखणी करावी, या विषयातल्या संशोधनासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी यासह कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट, सांडपाण्यावर प्रक्रिया, नद्यांचं रक्षण, पाण्याची पातळी वाढवणे आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कार्यक्रम राबवण्याची मागणीही आमदार हेमंत टकले यांनी या चर्चेत केली.