Published On : Fri, May 14th, 2021

ग्लोकल स्क्वेअर मॉलमध्ये ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा शुभारंभ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लसीकरणाची सुरूवात

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरामध्ये ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा शुक्रवारी (१४ मे) शुभारंभ सकाळी झाला. सीताबर्डी येथील मुंजे चौकातील ग्लोकल स्क्वेअर मॉलमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा शुभारंभ झाला.

लसीकरण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य समिती सभापती महेश महाजन, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, ग्लोकल स्क्वेअर मॉलचे प्रोजेक्ट डायरेक्टर अनूप खंडेलवाल, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. सरीता कामदार, व्हॅक्सिनेशन कोल्डचेन केंद्राचे प्रमुख राविल यादव, डॉ.पूजा बाजड, निखील लोहे, मनोहर भलावी आदी उपस्थित होते.

सीताबर्डी येथील मुंजे चौकातील ग्लोकल स्क्वेअर मॉलमध्ये ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’द्वारे सर्वप्रथम लस घेणा-या ६२ वर्षीय शरनाज डॉवर यांचे ना. नितीन गडकरी यांनी गुलाबपुष्प देउन स्वागत केले. याशिवाय लस घेण्यासाठी व्हिलचेअरवर आलेल्या ६६ वर्षीय मायाराणी विनोद शर्मा व ८९ वर्षीय श्रीमती लक्ष्मीदेवी मंत्री यांचेही ना. गडकरी यांनी पुष्प देउन स्वागत केले. शहरातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला लस मिळावी यासाठी नागपूर महानगरपालिकेने घेतलेला ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा पुढाकार स्तुत्य आहे. घरात बसून असलेले आजारी ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी वंचित राहू नयेत यासाठी हा उत्तम उपक्रम आहे. ‘कोव्हिशिल्ड’चा दुसरा डोज अथवा पहिला डोज घेऊ इच्छीणा-या ६० वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

मनपाच्या बुटी दवाखान्यातील परिचारिका प्राची खैरकर यांनी सर्व पात्र नागरिकांना लस देउन लस घेतल्यानंतर घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती दिली.

‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’द्वारे ६० वर्षावरील नागरिकांना त्यांच्या वाहनामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ लस दिली जात आहे. यासाठी पात्र नागरिकांनी घरातील व्यक्तींबरोबर लसीकरण केंद्रावर आपले आधार कार्ड किंवा पॅनकार्ड सोबत घेउन जावे. नोंदणी झाल्यानंतर ज्येष्ठांना त्यांच्याच वाहनामध्ये लस दिली जाते. यानंतर काही वेळ देखरेखीत ठेवून आवश्यक औषधे देउन नागरिकांना घरी जायला सांगितले जात आहे.
शहरातील लसीकरण मोहिमेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी वेगळी व्यवस्था असावी, याबाबत ज्येष्ठ नागरिकांकडून मागणी करण्यात आली असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. काही नागरिक प्रकृती स्वास्थ्यामुळे लसीकरण केंद्रावर जाउन प्रतीक्षा करू शकत नाही. अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ हे उत्तम व सोयीचे ठरत आहे. स्वत:च्या वाहनात बसून लसीकरण केंद्रावर यावे वाहनातून खाली न उतरता तिथेच त्यांना लस दिली जात आहे. शहरातील ६० वर्षावरील प्रत्येक नागरिकाने आपले लसीकरण पूर्ण करण्यासाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा लाभ घ्यावा. लसीकरण केंद्रावर येणा-या ६० वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लस दिली जाणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी स्वत:च्या चारचाकी, दुचाकी वाहनातून, ऑटोने मिळेल त्या साधनाने ग्लोकल स्क्वेअर मॉल आणि व्‍ही.आर. नागपूर (ट्रिलियम)मॉल येथे जाउन ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’द्वारे आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले.