Published On : Fri, May 4th, 2018

दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश

Advertisement

मुंबई : भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या मृत्यूनंतर तीन महिने उलटले तरीही भाजपचा एकही नेता किंवा कार्यकर्ता फिरकला नाही. आता वनगा कुटुंबियांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहे . वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले असा त्यांचा आरोप
आहे . त्यामुळे आम्ही भाजप पक्ष सोडत आहोत असा आक्रोश वनगा कुटुंबीयांनी आज व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून वनगा कुटुंबीयांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच पालघर जिल्हा संपर्वâप्रमुख आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते.

पालघरचे आमदार चिंतामण वनगा यांचे ३० जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा कालावधीत पक्षातील एका तरी नेत्याने या कुटुंबाची भेट घेणे अपेक्षित होते, मात्र या कुटुंबाकडे सर्वांनीच पाठ फिरवली, असा आरोप कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केला आहे .

यावेळी चिंतामण वनगा यांची पत्नी जयश्री वनगा, पुत्र श्रीनिवास व प्रफुल्ल, सुना, नातवंडे संपूर्ण कुटुंबीयच उपस्थित होते.
ज्या पालघरमध्ये पक्षाला दोन मतेही मिळणे शक्य नव्हते तिथे खासदार चिंतामण वनगा यांनी भाजप पक्ष उभा केला, कार्यकर्ते घडवले. आपल्या आयुष्याची मोलाची ३०-३५ वर्षे वेचली, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर तीन महिने उलटले तरीही भाजपचा एकही नेता किंवा कार्यकर्ता फिरकला नाही, याचे दुःख आहे .
आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली. मात्र ती देण्यात न आल्याची खंतही कुटुंबीयांनी व्यक्त केली .