Published On : Tue, Feb 9th, 2021

स्व. मनोहरभाई पटेल यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य प्रेरणादायी

Advertisement

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गोंदिया : साधन सुविधा नसलेल्या काळात स्व. मनोहरभाई पटेल यांनी उदात्त हेतूने केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

स्व. मनोहरभाई पटेल यांच्या 115 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयोजित सुवर्ण पदक प्रदान समारोह कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार प्रफुल्ल पटेल, हरिहरभाई पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार अभिजित वंजारी, विनोद अग्रवाल, सहसराम कोरोटे, विजय रहांगडाले, राजू कारेमोरे व नरेंद्र भोंडेकर या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते. स्व.मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राज्यपालांनी अभिवादन केले. त्यांनतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोंदिया शिक्षण संस्था उभी करून या भूमीत शैक्षणिक संस्कार रुजविण्याचे काम मनोहरभाईनी केल्याचे
श्री. कोश्यारी म्हणाले. चांगले विचार व संस्कार माणसांना मोठे करतात असे सांगून राज्यपाल म्हणाले की, या संस्थेमधून हे संस्कार रुजविण्याचे काम अव्याहतपणे केले गेले आहे. मनोहरभाईंनी लावलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यावेळी राज्यपालांनी मातृशक्तीचा उल्लेख करून महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठले असल्याचे सांगितले. पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या जास्त असल्याचा उल्लेख करून ग्रामीण भागातील महिलांनी सुद्धा आपल्या कर्तुत्वाने विविध क्षेत्र पादाक्रांत केली आहे आहेत. मातृशक्तीचा हा जागर शैक्षणिक क्रांतीमुळेच शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

मनोहरभाईंचे शैक्षणिक व सामाजिक कार्य सर्वांनी आचरणात आणावे असे सांगून देशाच्या विकासासाठी व प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे राज्यपाल म्हणाले. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

भंडारा-गोंदिया जिल्हा एक असतांना भंडारा येथे केवळ एकच शाळा होती अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मनोहरभाईंनी एकाच दिवशी 22 हायस्कूलची उभारणी करून गोरगरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. शिक्षण व समाजकार्याला महत्त्व देत त्यांनी गोंदिया शिक्षण संस्था उभारली व आज गोंदिया भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणली आहे. मनोहरभाईंनी केवळ शिक्षणच नाही तर सिंचनालाही महत्त्व दिल्याचे त्यांनी सांगितले. मनोहरभाईंच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा त्यांनी यावेळी आढावा सादर केला. या कार्यक्रमापूर्वी एनएमडी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित कृषी उत्पादन व हस्तकला प्रदर्शनीला श्री. कोश्यारी यांनी भेट दिली. एन.एम.डी महाविद्यालयातील रसायणशास्त्र प्रयोगशाळेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.

विविध परिक्षा व विषयात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोविड काळात
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉ. सुवर्णा हुबेकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले. विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, प्राध्यापक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.