Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Aug 16th, 2018

  स्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या भावना..

  श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी…
  अटल, अढळ, अचल, नित्य…

  अटलबिहारी वाजपेयी…
  केवळ कुण्या एका व्यक्तीचे हे नाव नाही, तर ते नाव आहे एका महासागराचे…
  नावाप्रमाणेच अटल, अढळ, अचल…

  ज्यांच्याकडे पाहून राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ कळतो, ज्यांच्याकडे पाहून राष्ट्राच्या सर्वांगिण विकासाच्या स्वप्नपूर्तीची अभिलाषा जागी होते, आदर्श, सत्यवचनी, कर्तव्य कठोर पण, तितक्याच निर्मळ मनाचा थोर नेता, आधुनिक युगातील एक महापुरूषाचे आज आपल्यातून असे निघून जाणे, मनाला अतिशय अतिशय वेदना देणारे आहे.

  आमचे थोरनेते, राष्ट्रपुरूष श्रद्धेय अटलजी यांचे आपल्यातून निघून जाणे, ही माझी वैयक्तिक हानी आहे! ज्या नेत्यांकडे पाहून आपण राजकारणाची पायरी चढलो, त्या आदर्शापैकी श्रद्धेय अटलजी एक! लोकशाहीत विविध आयुधं वापरून समाजाची आणि समाजातील शेवटच्या घटकाची सेवा कशी करता येऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आयुष्यातून घालून दिला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

  आज माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी डोळ्यापुढे तरळत आहेत. स्व. प्रमोदजी महाजन यांच्यासमवेत त्यांची झालेली पहिली भेट, त्यानंतर पुढे त्यांचे सातत्याने होत राहिलेले मार्गदर्शन आणि अगदी अलिकडे त्यांच्या निवासस्थानी झालेली भेट, हा सारा स्वप्नवत प्रवास. श्रद्धेय अटलजींच्या अशा अचानक निघून जाण्याने कधीही भरून न निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

  तन, मन, धनाने राष्ट्रासाठी अगदी सर्वस्व झोकून देणारे आपल्या सर्वांचेच श्रद्धेय अटलजी हे लाडके नेते. संसद असो की एखादी जाहीर सभा, श्रद्धेय अटलजींना ऐकण्यासारखा दुसरा ज्ञानानंद नाही. ज्ञानाचा महासागर, ओघवत्या वक्तृत्वाचे धनी, त्यागाच्या तपस्वी मूर्तीचे जाणे अतिशय वेदनादायी आहे. कधीही न भरून निघणारी ही हानी आहे.

  श्रद्धेय अटलजी त्यांच्या विचार, मार्गदर्शनाच्या रूपाने आम्हा सर्वांना सतत प्रेरणा देत राहतील. केवळ गतकाळातील नाही, तर येणार्‍या अनेक पिढयांचेही ते मार्गदर्शक असतील. या राष्ट्रऋषीला माझे कोटी कोटी वंदन. या दु:खातून बाहेर पडणे किंवा त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे!

  श्रद्धेय अटलजी हे केवळ भाजपाचे नाही, तर या देशाचे सर्वोच्च नेते होते. ज्या मोजक्या नेत्यांना जगभर आदर-सन्मान प्राप्त झाला, त्यातील अटलजी एक. विश्वमान्यतेच्या अटलजींचे नेतृत्त्व सर्व राजकीय पक्षांमध्ये सुद्धा सर्वमान्य होते.

  एक विशाल हृदयाचा, मोठ्या मनाचा नेता सदैव आपल्यासोबत असावा, अशीच आम्हा सर्वांची इच्छा. पण, नियती कधीच कुणाचे ऐकत नाही. आज जेव्हा भारताच्या परमवैभवाचा प्रवास अतिशय गतीने सुरू आहे, त्या काळात या परमवैभवाच्या प्रवासाचा पाया, ज्यांनी रचला ते आपल्यात असते तर त्यापेक्षा आनंदाचा दुसरा क्षण राहिला नसता.

  पण, नियतीला ते मान्य नाही.
  अटलजी एका कवितेत म्हणतात,

  ठन गई।
  मौत से ठन गई।
  मै जी भर जिया, मै मन से मरूँ
  लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?

  अटलजी आपल्यात नाहीत, हे सत्य स्वीकारताना मन कठोर करावेच लागेल. भारतीय जनता पार्टीच्या देशभरातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या, अटलजींवर ज्यांनी नि:स्सिम प्रेम केले, ते या देशातील तमाम नागरिकांच्या दु:खात मी सहभागी आहे. एकमेकांना धीर देण्याच्या पलिकडे आपल्या हातात तरी काय आहे?
  अटल, अढळ, अचल असलेले हे नेतृत्त्व नित्य आपल्यासोबत राहील, विचारांच्या रूपाने, दिशादर्शकाच्या रूपाने, मार्गदर्शकाच्या रूपाने…
  माझी भावपूर्ण श्रद्धांजली…

  देवेंद्र फडणवीस
  मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145