मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी, e-KYC संदर्भातील चुका तसेच थांबलेले हप्ते याबाबत महिलांना आता कार्यालयांचे फेरे मारावे लागणार नाहीत.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेसंदर्भातील तक्रारी आणि शंकांच्या निरसनासाठी ‘१८१’ हा स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू केल्याची घोषणा केली आहे. या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास लाभार्थी महिलांना त्यांच्या समस्यांबाबत थेट मार्गदर्शन मिळणार असून, कॉल स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
e-KYC प्रक्रियेदरम्यान चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. अशा प्रकरणांमध्ये आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष लाभार्थींच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे, त्यामुळे पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना ही प्रक्रिया योग्यरित्या पूर्ण करता आली नाही. याचा परिणाम म्हणून काही भागांमध्ये, विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांत, महिलांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने हस्तक्षेप करत तोडगा काढला आहे.
दरम्यान, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ या कालावधीतील प्रलंबित हप्ते जानेवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत वितरित करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य व पोषणात सुधारणा आणि थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून मदत पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
ज्या लाभार्थी महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नाही किंवा अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे, त्यांनी तातडीने ‘१८१’ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









