नागपूर : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन आता सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक यांनी 16 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संपावर जाण्याचे जाहीर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास 28 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी सरपंचाला 15 हजार रुपये, उपसरपंचला 10 हजार रुपये आणि सदस्याला 3 हजार रुपये मानधन मिळावे या प्रमुख मागणीसह आंदोलन करत आहेत.
याबाबत मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अजूनही आमच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जयंत पाटील म्हणाले की, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी समस्यानिवारण करून आमचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.