Published On : Mon, Apr 27th, 2020

मध्य भारतातील पहिले मेडीकलचे कोविड हॉस्पिटल रुग्णांसाठी सज्ज

नागपूर : दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना संसर्गाला समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन परिश्रम घेत आहे. याच प्रयत्नांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात मेडिकलने पुढाकार घेतला असून मेडिकल मध्येच असलेल्या ट्रामा केअर सेंटरला 220 खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले आहे. मध्यभारतातील पहिले कोविड रुग्णालय आजपासून रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. ट्रामा केयर सेंटरला कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, ट्रामा केअर सेंटरचे प्रमुख डॉ. प्रवीण पटनाईक, नोडल अधिकारी डॉ.मोहम्मद फैजल, बाधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेश तिरपुडे, औषधी वैद्यकशास्त्र प्रमुख डॉ.राजेश गोसावी यांनी अहोरात्र परिश्रम घेत केवळ 10 दिवसात केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली असल्यामुळे हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेत रुजू झाले.

विशेष म्हणजे या कोविड रुग्णालयात 60 खाटांच्या आयसीयू सोबत स्वतंत्र क्ष-किरण विभाग, स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र रक्तसाठा केंद्र असणार आहे. मध्य भारतातील सर्व सोयींनी युक्त असे हे अत्याधुनिक पहिले कोविड रुग्णालय ठरले आहे. या रुग्णालयात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रुग्णांवरील उपचाराला 3 भागात विभागणी करण्यात आली असून यात कोरोना लक्षणे नसलेल्यांसाठी कोविड केअर सेंटर, सामान्य लक्षणे असलेल्यांसाठी कोविड हेल्थ सेंटर तर गंभीर रुग्णांसाठी विशेष केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोविड हॉस्पिटल मधून कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून रुग्णांसाठी आणि डॉक्टरांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात आला आहे. रुग्णालयाच्या सर्व वार्डात रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी काचेचा विशेष कक्ष तयार करण्यात आल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांनी सांगितले आहे.

डायलिसिसवर असलेल्या रुग्णामध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याच्या सोयीसाठी 3 डायलिसीस यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांचे विशेष सहकार्य मिळाले.


असे आहे कोविड हॉस्पिटल
ट्रॉमा केअरचे संपूर्ण ससज्ज इमारत कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत. * 60 आयसीयू बेड * 30 प्रिझमटीव्ह बेङ * संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड * कोरोनाबाधित रुग्णांसाठी 130 खाटांचे एचडीयू * 40 व्हेन्टिलेटर * तीन डायलिसीस यंत्र * प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन व सक्शन यंत्र * स्वतंत्र रेडिओलॉजी विभाग, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे. * सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग * रक्त तपासणी, रक्ताची साठवणूक व प्लाझ्मा स्टोरेज सुविधा. * डॉक्टर व रुग्णांसाठी येण्या-जाण्याचा स्वतंत्र मार्ग.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कोविड-19’चे नोडल अधिकारी व ‘ट्रॉमा केअर सेंटर’चे प्रमुख डॉ.मोहम्मद फैजल, कोविड हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.पवित्र पटनाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे, डॉ.जयेश मुखी, डॉ.कांचन वानखेडे, डॉ.मनीष ठाकरे, डॉ.मेश्राम, डॉ.सोमा चाम व मेट्रन मालती डोंगरी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.

संसर्ग पसरु नये याकडे विशेष लक्ष

‘कोविड हॉस्पिटल’मधून संसर्ग पसरु नये यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. रुग्णांसाठी व डॉक्टरांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे.

डॉक्टरांना बाहेर जाण्यासाठीही वेगळा मार्ग आहे. पीपीई किट घालण्याचा व तो काढण्याचा कक्षही वेगळा आहे. वॉर्डात रुग्णांवर देखरेख करण्यासाठी काचेचा कक्ष तयार करण्यात आला आहे.