
नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या म्हैसूर पाक प्रकरणावरून चर्चेला उधाण आले असताना, मंदिर प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. FDA विभागाने म्हैसूर पाकच्या नमुन्याबाबत केलेली कारवाई ही मंदिर संस्थानच्या अन्नछत्रात तयार करण्यात आलेल्या पदार्थावर नसून, संबंधित कंत्राटदाराने बाहेरून आणलेल्या तयार प्रसादाशी संबंधित असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, संस्थानच्या अन्नछत्रात म्हैसूर पाक तयार केला जात नाही. अन्नछत्रामध्ये भाविकांसाठी दररोज ताजे, सात्त्विक आणि स्वच्छ भोजन तयार करून दिले जाते. FDA विभागाच्या कारवाईशी अन्नछत्रातील भोजन व्यवस्थेचा संबंध नसल्याचेही प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकातून नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंदिर संस्थानने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही केली आहे. संबंधित कंत्राटदाराने FDA विभागाच्या कारवाईविरोधात नियमानुसार अपील दाखल केले असून, पुढील प्रक्रिया कायदेशीर मार्गाने सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
भाविकांच्या आरोग्याची काळजी, अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता या बाबींना संस्थानकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका मंदिर प्रशासनाने मांडली आहे.
तसेच, संपूर्ण वस्तुस्थिती जाणून न घेता श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानची बदनामी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनीही संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती पडताळून आणि वस्तुस्थितीच्या आधारेच बातम्या प्रसारित कराव्यात, अशी विनंती कोराडी मंदिर प्रशासनाने केली आहे.



