Published On : Fri, Aug 7th, 2020

कोराडी देवस्थानाबाबत कितीही अपप्रचार केला तरी सेवा कार्य सुरूच राहील

कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान च्या परिसरात सुरू असलेल्या विविध मंदिरांच्या बांधकामाबाबत काही विघ्नसंतोषी आणि समाजविघातक प्रवृत्तीची मंडळी समाज माध्यमांवर अपप्रचार करीत असून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करीत आहेत.

परंतु सर्वसामान्य नागरिक आणि भक्तांमध्ये कुठलाही संभ्रम राहू नये म्हणून पुढील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यात येत आहे.

सर्वांना कल्पना आहे की, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी ला राज्यस्तरीय ब वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. या स्थळाच्या मंदिर विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी प्रदान केली आहे.


या स्थळावर जुने राम मंदिर, शिव मंदिर, कालीमाता मंदिर, कुंड व कुंडातील मूर्ती आणि हनुमान मंदिराची बांधकामे प्रस्तावित आहेत. सर्वांना एक गोष्ट सांगायलाच हवी की, यातील राम मंदिर, हनुमान मंदिर, गजानन महाराज मंदिर या तीन मंदिरांचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे.

ज्यांनी कोराडीच्या विकासासाठी कधीही एक कवडीची शासकीय किंवा वैयक्तिक मदत केली नाही ती विकृत मंडळी आता सोशल मीडियावर कोराडी देवस्थान आणि विकास कामांबाबत बदनामी करीत आहेत. कोराडी देवस्थान च्या विकासासाठी माजी पालकमंत्री श्री.

चंद्रशेखर बावनकुळे अनेक वर्षांपासून झटत आहेत. त्यांच्या परिश्रमा मुळेच हा विकास होऊ शकला आहे, ही वस्तुस्थिती सर्वच जण मान्य करतात. असे असतांना ज्यांना कोराडी मंदिराचा विकास बघवत नाही ती समाजविघातक प्रवृत्ती नैराश्यातून ही बदनामी करीत आहेत.

परंतु त्यांचे मनसुबे सामान्य नागरिक आणि भक्तगण यशस्ची होऊ देणार नाहीत. त्यांनी कितीही बदनामी केली, आमच्या मार्गात अडथळे आणले तरीही आम्ही आमचे हे सेवा कार्य असेच पुढेही कायम ठेऊ.