Published On : Tue, Jan 25th, 2022

कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील प्रदुषणावर तत्काळ उपाययोजना करा –सुनील केदार

Advertisement

नागपूर: कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे परिसरातील गावांमध्ये जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे, याबाबत तत्काळ कार्यवाही करुन होणारे प्रदुषण नियंत्रणात आणण्याच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.

कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील गावांमध्ये होणाऱ्या हवा व पाणी प्रदुषणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, पोलीस उप अधीक्षक संजय पुरंदरे, पशुसंवर्धन अधिकारी श्रीमती पुडंलीक, शुभांगी पडोळे, श्याम मदनकर, उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नांदगाव व बखारी ग्रामपंचायत येथील राख विसर्जन प्रकल्पामुळे या भागामध्ये हवा व पाणी प्रदुषित होत आहे. ही बाब जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आहे. सावनेर तहसीलदारांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या चमुसोबत पाहणी करुन तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना श्री.केदार यांनी दिल्या.

राख विसर्जन प्रकल्पामुळे या भागातील बोअरवेल व डबवेलचे पाणी दुषित झाले आहे. तसेच याचा धोका पिकांना सुध्दा होऊ शकतो, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कोलार, कन्हान नदीसोबतच पेंच नदीत खड्डे खोदून त्यात राख टाकली जाते त्यामुळे पेंच नदीही प्रदुषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी संबंधित यंत्रणेने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन महसूल विभागाची मदत घ्यावी व दुषित पाण्यावर उपाययोजना कराव्या. ॲशबोर्ड प्रदुषण मंडळाच्या निर्देशानुसार कार्यवाही झाली काय याबाबत अहवाल सादर करावा, असेही ते म्हणाले.

ज्यांच्या जमीनी या प्रकल्पात गेल्या त्याविषयी भूमिअभिलेख विभागाकडून याद्या मागवाव्यात. त्यांचा सातबारा तपासावा. तद्नंतर प्रकल्पाग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडविण्यात याव्यात. ज्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही त्यांना मोबदला द्यावा व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत समावून घ्यावे. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच कोल वाजरीजच्या वाहतूक संदर्भात उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

दुधाळ जनावरे वाहतूक संदर्भात बैठक
दुधाळ जनावरांच्या वाहतूकीबाबत पशुपालकांना पोलीसांनी आडकाठी करु नये, कोणत्याही प्रकरणाची शहानिशा केल्याशिवाय कारवाई करु नये, अशा सूचना त्यांनी पोलीस विभागाला केल्या. दुधाळ जनावरांच्या वाहतूकीबाबत कारवाई करतांना पोलीसांनी प्रथमदर्शनी छायाचित्र सोबत ठेवणे‍ गरजेचे आहे. त्यासोबतच दुधाळ जनावरांची तपासणी करुनच कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

प्रदुषण नियंत्रण मंडळ, पोलीस विभाग, विद्युत विभागाचे अधिकारी तसेच संबंधित गावाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.