मुंबई : आज आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा —हिंदू पंचांगानुसार वर्षातील एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. आजच्या दिवशी चंद्र आपली पूर्ण कलांकृती गाठतो आणि त्याचा तेजस्वी प्रकाश पृथ्वीवर अमृतासारखा बरसतो, अशी श्रद्धा आहे. या रात्री देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि चांदण्यात खीर ठेवून तिचं सेवन करणं शुभ मानलं जातं.
कोजागिरी पौर्णिमेची तिथी व वेळ-
पंचांगानुसार, आश्विन पौर्णिमा 6 ऑक्टोबर दुपारी 12:23 वाजता सुरू होऊन 7 ऑक्टोबर सकाळी 9:16 वाजता संपेल. त्यामुळे यंदा कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची योग्य वेळ 6 ऑक्टोबरच्या रात्री असेल.
लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त-
या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आराधना केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.
शुभ मुहूर्त : रात्री 11:45 ते 12:34 वाजेपर्यंत.
या काळात लक्ष्मी पूजन करावे. देव-लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर तूपाचा दिवा लावा, श्रीसूक्ताचे पठण करा आणि चंद्रप्रकाशात ठेवलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवा.
चंद्रप्रकाशात दूध आणि खीर ठेवण्याचं महत्त्व-
धार्मिक मान्यतेनुसार, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्याच्या किरणांमध्ये औषधी गुणधर्म असतात. म्हणूनच या दिवशी चांदण्याखाली ठेवलेली खीर किंवा दूध अमृतासारखे बनते. ही खीर दुसऱ्या दिवशी पहाटे प्रसाद म्हणून सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि मानसिक शांती मिळते.
खीर ठेवण्याची आणि खाण्याची योग्य वेळ-
खीर पांढऱ्या सुती कापडाने झाकून मोकळ्या जागेत चंद्रप्रकाशात ठेवा.
सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटे 4:00 ते 5:30 या वेळेत ती खीर प्रसाद म्हणून सेवन करा.
असे मानले जाते की सूर्योदय झाल्यानंतर खिरीतील चंद्रकिरणांचा प्रभाव कमी होतो.
चंद्राला अर्घ्य अर्पण करण्याची पद्धत-
या रात्री चंद्राला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते.
एका तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरा.
त्यात काही तांदूळ, पांढरी फुले आणि थोडं दूध मिसळा.
चंद्राकडे तोंड करून दोन्ही हातांनी अर्घ्य अर्पण करा.
यावेळी “ॐ चंद्राय नमः” असा मंत्र जप करा.
असे केल्याने चंद्रदेवाकडून आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात शांतता व सौहार्द वाढते.
कोजागिरी पौर्णिमेची पूजा पद्धत-
दिवसाची सुरुवात स्नानाने करा – शक्य असल्यास गंगाजळ किंवा पवित्र पाण्याने स्नान करा.
घरात स्वच्छता करून पूजा स्थान सजवा.
लक्ष्मी आणि विष्णूची मूर्ती किंवा चित्र स्थापन करा.
धूप, दीप, फुले, तांदूळ, फळे आणि मिठाई अर्पण करा.
खीर (गायीच्या दुधापासून बनवलेली) नैवेद्य म्हणून दाखवा.
चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करा.
दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी खीर प्रसाद म्हणून ग्रहण करा.
या दिवशी अन्न, कपडे, तांदूळ, दूध आणि मिठाईचे दान करणे अतिशय पुण्यदायी मानले जाते.
कोजागिरी पौर्णिमेचं धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व-
या दिवशी चंद्रप्रकाशाचा संपर्क शरीरातील दोष शांत करतो, अशी आयुर्वेदिक मान्यता आहे. त्यामुळे कोजागिरीच्या रात्री चांदण्यात बसून ध्यान करणं, कीर्तन ऐकणं आणि जागरण करणं आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक दृष्ट्या हितावह असतं.
आजची रात्र म्हणजे शुद्धता, समृद्धी आणि भक्तीचा संगम चांदण्याखाली लक्ष्मीचे स्वागत करा आणि चंद्रकिरणांनी न्हालेलं अमृतसमान दूध प्रसाद म्हणून ग्रहण करा.