Published On : Thu, Aug 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कोडामलेपल्ली येथे पैशांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापिकेची निर्घृण हत्या; हत्येनंतर गोव्यात केली मौजमजा

Advertisement

कोडामलेपल्ली येथे पैशांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापिकेची निर्घृण हत्या; हत्येनंतर गोव्यात केली मौजमजा

हैदराबाद : पैशांच्या हव्यासातून दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिकेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेवर चाकूने तब्बल २७ वार करून त्यांचा जीव घेतला. त्यानंतर चोरी केलेल्या पैशांतून दोघे गोव्याला गेले आणि तेथे मौजमजा केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

कल्लू रुपा रेड्डी असे मृत मुख्याध्यापिकेचे नाव असून त्या कोडामलेपल्ली येथील नागार्जुन पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत होत्या. या प्रकरणी पोलिसांनी शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी दोन्ही विद्यार्थ्यांच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात रोकड आढळली होती. रुपा रेड्डी यांनी याची माहिती त्यांच्या पालकांना दिली होती. त्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना फटकारले. याचाच राग मनात धरून त्यांनी मुख्याध्यापिकेला लक्ष्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

घरात घुसून दीड लाखांची चोरी-

Advertisement

१२ ऑगस्टच्या रात्री रुपा रेड्डी यांचे पती घरी नसताना दोन्ही विद्यार्थी त्यांच्या घरात शिरले. त्यांनी घरातून सुमारे दीड लाख रुपये चोरले. चोरी करताना रुपा रेड्डी यांनी एका विद्यार्थ्याला पाहिले. ओळख पटण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर दोघांनी मिळून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे.

हत्या केल्यानंतर दोन्ही विद्यार्थी घटनास्थळावरून पसार झाले. चोरीच्या पैशांसह ते गोव्याला गेले. तेथे फिरणे, पार्टी करणे आणि पैसे उधळणे सुरू केल्याचे तपासात समोर आले.

‘बाबू’ शब्दामुळे तपासाला मिळाली दिशा-

पोलिसांना तपासादरम्यान रुपा रेड्डी यांच्या मोबाईलमधील शेवटच्या संभाषणातील ‘बाबू’ हा शब्द महत्त्वाचा धागा ठरला. या आधारे पोलिसांनी शाळेतील ‘बाबू’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली.

यावेळी एका विद्यार्थ्याच्या वागणुकीवर पोलिसांना संशय आला. तो अचानक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने एका मित्रासोबत मिळून मुख्याध्यापिकेच्या घरात चोरी केल्याची आणि त्यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.