Published On : Sat, May 28th, 2022

खासदार क्रीडा महोत्सवचा समारोप : अरमान मलिकच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई

Advertisement


नागपूर.:  खेळाडूंसाठी खासदार क्रीडा महोत्सव हा एक मोठा यज्ञ आहे. देशातील प्रत्येक शहरात, जिल्ह्यात, राज्यात असे क्रीडा महोत्सव घेण्यात आले तर देशाला ऑलिम्पिकमध्ये एक नव्हे १०० मेडल्स मिळतील, असा विश्वास १९८३ मधील विश्व चषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार श्री. कपिल देव यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून १३ मे पासून नागपुरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा शनिवारी २८ मे रोजी श्री. कपील देव यांच्या विशेष उपस्थितीत समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत शहरातील यशवंत स्टेडियम येथे झालेल्या दिमाखदार समारोपीय सोहळ्याला प्रख्यात भारतीय क्रिकेटपटू व १९८३ मधील विश्व चषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार श्री. कपिल देव यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे एक्सिक्युटिव्ह डायरेक्ट श्री. डी. एस. किम, जेसीबी इंडिया लिमिटेडचे असोसिएट व्हॉईस प्रेसिडेंट जसमीत सिंग, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार क्रीडा महोत्सवचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी, माजी मंत्री ऍड. सुलेखाताई कुंभारे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. नागो गाणार, आमदार श्री. विकास कुंभारे, आमदार श्री. मोहन मते, माजी मंत्री श्री. राजकुमार बडोले, माजी मंत्री श्री. परिणय फुके, श्री. बबनराव तायवाडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी आदी उपस्थित होते.

Advertisement

खासदार क्रीडा महोत्सवाच्या चवथ्या सत्रात घेण्यात आलेल्या सर्व खेळांचे अध्यक्ष आणि सचिव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. कपील देव यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे विशेष अभिनंदन केले व सर्व खेळाडूंच्या वतीने आभार ही मानले. आजच्या तरुणांमध्ये जोश, उत्साहाची कमतरता नाही त्यांना फक्त सुविधांची गरज असल्याचे ते म्हणाले. खेळाडूंनी पैशासाठी नाही तर पॅशनसाठी खेळण्याचा मोलाचा मंत्र त्यांनी यावेळी दिला. खेळात पॅशन असेल तर यश पायाशी लोळण घालील. मात्र आधीच जर पैशाच्या मागे लागलात तर यश मिळू शकणार नाही, असाही मंत्र त्यांनी दिला. खेळाडूंना खासदार क्रीडा महोत्सवासारखी साथ मिळाल्यास यशाचा मार्ग कुणीही रोखू शकणार नाही, असेही श्री. कपील देव म्हणाले.

पुढील वर्षी १ कोटींची बक्षिसे : ना. नितीन गडकरी

खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत खेळ आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी पुढील वर्षी १ कोटींची बक्षिसे देण्यात येतील, अशी घोषणा यावेळी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी केली. कोरोनातील दोन वर्षानंतर आयोजित होणार खासदार क्रीडा महोत्सव हा खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक, नागरिक या सर्वांच्या सहकार्याने आयोजित झाला. सर्वांच्या सहकार्यामुळेच नागपुरात ‘खेलो नागपूर’ हे वातावरण निर्माण झाले. मागील १६ दिवसात ४५ हजारावर खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली. शहराचे माजी महापौर खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक श्री. संदीप जोशी यांच्या नेतृत्वात महोत्सव यशस्वी झाल्याचे सांगत त्यांनी संपूर्ण समितीचे अभिनंदन केले.
नागपुरातून नवे नेतृत्व पुढे यावेत, खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराचे नाव लौकिक करावे, हा या क्रीडा महोत्सवाचा उद्देश आहे, असेही सांगतानाच पुढील वर्षी दिव्यांगांसाठी विशेष क्रीडा महोत्सव घेण्यात येणार असल्याचे ना. श्री. नितीन गडकरी यांनी जाहीर केले.

यावेळी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे कौतुक केले. क्रीडा महोत्सवाने स्थानिक खेळाडूंसाठी मोठे व्यासपीठावर निर्माण केले आहे. अशात श्री. कपील देव यांच्यासारख्या ‘लिजेंडरी’ खेळाडूने स्वतः येऊन प्रोत्साहन देणे ही एका खेळाडूसाठी खूप मोठी प्रेरणादायी बाब असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी आणि संपूर्ण चमूचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातखासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी १६ दिवस ३४ खेळांच्या स्पर्धा एकाचवेळी ४० मैदानांवर झालेल्या असून ९२३७ सामने खेळून खेळाडूंनी ५६० चषक, ७८३० पदक जिंकले, विजेत्यांना ९३ लक्ष रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे सांगितले. समारोपीय कार्यक्रमात श्री. बबनराव तायवाडे यांना क्रीडा महर्षी पुरस्कार, खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत असून यंदा क्रीडा संघटनेला विशेष बेस्ट कोऑपरेशन पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी श्री. संदीप जोशी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पोलिस बांधव, पत्रकार बंधू भगिनी, महाराष्ट्र विद्युत महामंडळ यासह सर्व क्रीडा संघटक आदींचे आभार मानले.

अरमान मलीकने सोडली तरुणाईवर छाप

आपल्या बहारदार गीतांनी सुप्रसिद्ध गायक अरमान मलीक नागपूरकरांच्या गळ्यातील ताईत ठरला. त्याच्या एकाहून एक गीतांवर यशवंत स्टेडियमवर तरुणाई चांगलीच थिरकली. नॉनस्टॉप गाणे, प्रेक्षकांशी संवाद या खास शैलीने संपूर्ण स्टेडियम एकाच सुरात रंगला.

श्री. बबनराव तायवाडे यांना यंदाचा ‘क्रीडा महर्षी’ पुरस्कार

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाला खासदार क्रीडा महोत्सव समितीतर्फे दरवर्षी ‘क्रीडा महर्षी’ पुरस्काराने गौरविण्यात येते़. या वर्षीचा ‘क्रीडा महर्षी’ पुरस्कार श्री. बबनराव तायवाडे यांना प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, राज्याचे क्रीडा मंत्री श्री. सुनील केदार, श्री. कपील देव यांनी श्री. तायवाडे यांना सन्मानचिन्ह आणि ५ लक्ष रुपयांचा धनादेश प्रदान करून ‘क्रीडा महर्षी’ पुरस्काराने गौरविले.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या वर्षी श्री. सरदार अटल बहादूर सिंग, दुसऱ्या क्रीडा महोत्सवात श्री. शशांक मनोहर, तिसऱ्या क्रीडा महोत्सवात श्री. भाऊ काणे यांना ‘क्रीडा महर्षी’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्कार

विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि खेलो इंडिया खेलो स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘क्रीडा भूषण’ पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. संजना जोशी (सायकलिंग), शादाब पठाण (ऍथेलेटिक्स), स्टॅनली पीटर (फुटबॉल), अनूप मस्के (बास्केटबॉल), ईशिका वरवडे (बॉक्सिंग), प्रवीण धांडे (तायक्वांडो), प्रेरणा यादव (रायफल शूटिंग), दीपाली सबाने (खो-खो), सेजल भुतडा (लॉन टेनिस), दिव्या देशमुख (बुद्धिबळ), रिशिका बडोले (जलतरण), संदीप गवई (तिरंदाजी), रितिका ठक्कर (बॅडमिंटन), वैभव श्रीरामे (योगासन), केतकी गोरे (ज्यूडो), ऋषभ जोद्देवार (सॉफ्टबॉल), जेनिफर वर्गीस (टेबल टेनिस), हिमांशी गावंडे (हॉकी), शशांक वानखेडे (कबड्डी), अभिषेक ठावरे (दिव्यांग स्पर्धा), सौरभ रोकडे (व्हॉलीबॉल), दामिनी रंभाड (तलवारबाजी), इरशाद सागर (सेपक टॅकरा) पूनम कडव (हँडबॉल), अल्फीया शेख (पॉवर लिफ्टिंग) या सर्व खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

द नागपूर डिस्ट्रीक्ट हार्डकोअर टेनिस असोसिशनला ‘बेस्ट कोऑपरेशन अवार्ड’

खासदार क्रीडा महोत्सवामध्ये क्रीडा संघटनांचे मोलाचे सहकार्य असते. खासदार क्रीडा महोत्सवतर्फे दरवर्षी एका क्रीडा संघटनेला ‘बेस्ट कोऑपरेशन अवार्ड’ प्रदान करण्यात येतो. यावर्षी ‘द नागपूर डिस्ट्रीक्ट हार्डकोअर टेनिस असोसिशन’ या क्रीडा संघटनेला ‘बेस्ट कोऑपरेशन अवार्ड’ ना. श्री. नितीन गडकरी, ना.सुनील केदार, श्री. कपील देव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मान्यवरांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह आणि १ लक्ष रुपयांचे धनादेश देऊन गौरविले.

कार्यक्रमाचे संचालन आरजे राजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार क्रीडा महोत्सव समितीचे पीयूष आंबुलकर, नागेश सहारे, डॉ. पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतीश वडे, सचिन माथाने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत क्रिपाने, आशिष मुकीम, प्रकाश चंद्रायण आदींनी सहकार्य केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement