Published On : Sat, Dec 18th, 2021

कैलाश रंगात रंगले नागपूरकर ; खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा दुसरा दिवस नृत्‍य, संगीताने गाजला

Advertisement

नागपूर: आपल्‍या खड्या आवाजात लोकगीत, सुफीयाना गीतांमध्‍ये रंग भरत सुप्रसिदृ गायक पद्मश्री कैलाश खेर यांनी कैलाश रंगात नागपूरकरांना रंगवले. ‘रंग दिनी पिया के रंग दिनी ओढनी’ हे गीत सादर करून कैलाश खेर यांनी नागपूरकरांना थिरकायला भाग पाडले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2021 चे शुक्रवारी शानदार उद्घाटन झाल्‍यानंतर आज महोत्‍सवाच्‍या दुस-या दिवशी ”कैलाश खेर अँड कैलासा’ लाईव्‍ह कॉन्‍सर्टचे आयोजन करण्‍यात आले होते. दुस-या दिवसाच्‍या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्‍यासह खासदार विकास महात्‍मे, जिल्‍हाधिकारी आर. बिमला, एअर मार्शल शिरीष देव, मेजर जनरल अनिल बाम, मेजर शिल्‍पा खडतकर, कॅप्‍टन विरसेन तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दिपप्रज्‍वलन झाल्‍यानंतर कैलाश खेर यांचे आगमन झाले. सुरुवातीला मै तो तेरे प्‍यार में दिवाना हो गया, आओ जी आओ जी अशी गाणी सादर करून रसिकांची संवाद साधला. तौबा तौबा वे तेरी सुरत माशाअल्‍ला वे तेरी सुरत, तेरे बिन नही लगदा दिल मेरा ढोलना, जय जय कारा, डालो ना रंग, पिया घर आयेंगे, या रब्‍बा, चकदे फट्टे अशी विविध लोकप्रिय गीते कैलाश खेर यांनी सादर करून गुलाबी थंडीत नागपूरकर रसिकांना सुरांची ऊब दिली.

खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, संजय गुलकरी, रेणुका देशकर, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. आरजे मोना आणि आरजे अमोघ यांनीही त्‍यांना साथ दिली.

लाखो लोकांनी घेतला आस्‍वाद

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा पहिल्‍या दिवशी लाखो रसिकांनी फेसबुक व युट्यूब लाईव्‍हच्‍या माध्‍यमातून कार्यक्रमाचा आस्‍वाद घेतला. शिवाय, पटांगणाच्‍या बाहेर लावण्‍यात आलेल्‍या स्‍क्रीनवरूनही नागपूरकर रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. हा संगीत महोत्‍सव आपला सगळ्यांचा आहे. हा अभूतपूर्व प्रतिसादामुळे खूप आनंद झाला आहे, असे नितीन गडकरी यावेळी म्‍हणाले.

ये तो भोले नगरी है

नागपूर हे संत्र्याचे शहर म्हणून जरी ओळखले जात असले ते येथे परमात्‍मा महाशिवाचा वास आहे. हे शहर म्‍हणजे अध्‍यात्‍माचा गड असून येथून जवळच त्र्यंबकेश्‍वरमध्‍ये शिवाचे ज्‍योतिर्लिंग वसलेले आहे. त्‍याचा प्रभाव या भूमीवर आहे, असे सांगताना कैलाश खेर यांनी नितीन गडकरीचा उल्‍लेख ‘भोला’ असा केला. राजकारणात राहूनही गडकरीजी सतत हसत असतात. ते कधीच तणावात दिसत नाहीत. त्‍यांच्‍यावर भगवान भोलेचा आशीर्वाद आहे, असे म्‍हणत कैलाश खेर यांनी त्‍यांना सुखी दाम्‍पत्‍य जीवनासाठी शुभेच्‍छा दिल्‍या.

19 डिसेंबर रोजी महोत्‍सवात ‘कविसंमेलन’

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात  19 डिसेंबर रोजी ‘कविसंमेलन’ होणार आहे. कवी कुमार विश्‍वास, विमल त्‍यागी, शिखा पचुरी, विनीत कुमार आणि शंभू चौधरी यांचा यात सहभाग राहील.