Published On : Sun, Jun 25th, 2017

खापरी रेल्‍वे ओवर ब्रिज 12 महिन्‍याच्‍या कालावधित पूर्ण करणार – नितीन गडकरी


नागपूर:
नागपूर-वर्धा महामार्गावरील खापरी पूलाजवळ वाहतूक कोंडी व अपघात टाळण्‍यासाठी खापरी रेल्‍वे ओवर ब्रीजचे बांधकाम हे निर्धारित 24 महिन्‍याच्‍या कालावधी ऐवजी 12 महिन्‍यात पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय रस्‍ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे व्यक्त केला. नागपूर-हैदराबाद राष्‍ट्रीय महामार्ग 7 वरील 1.2 किमी लांबीच्या व 60 कोटी रुपयाच्या तरतुदीने राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्‍दारे बांधल्‍या जाणा-या खापरी रेल्‍वे ओवर ब्रीजच्‍या भूमीपूजनाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नागपूर शहरात सुमारे 38 हजार कोटींची कामे व केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्रालयाच्‍या सी.आर.एफ. निधी अंतर्गत 12 हजार कोटींचे कामे करण्‍यासाठी एकूण 50 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने सुमारे 795.96 कोटी रूपयांची तरतूदीने 4.10 किमीचा हॉटेल रेडीसन ब्‍लू ते हॉटेल प्राईड या पट्टयात उड्डाण पुलाचे मनिष नगर आर.ओ.बी. सह बांधकाम, राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 7 वर नागपूर-हैदराबाद मार्गावर 1.12 किमी चे खापरी येथे 60 कोटी रूपयाच्‍या तरतुदीने आर.ओ.बी.चे बांधकाम, 6.94 लांबीच्‍या आर.ओ.बी. व नागनदीवर पुलासह राष्‍ट्रीय महामार्ग 6 वरील पारडी चौपदरी उड्डाणपुलाचे 448 कोटी रूपयाच्‍या तरतुदीने बांधकाम इत्‍यादी कामांचा समावेश असून या कामांची सुरूवात राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणा आंतर्गतचालूही झाली आहेत. लवकरच सुरू होणा-या प्रकल्‍पाच्‍या कामात राष्‍ट्रीय महामार्गक्र. 6 वर आर.टी.ओ. कार्यालय ते विद्यापीठ परिसरापर्यंत उड्डाणपुलाचे 262 कि.मी.चे बांधकाम, कोराडी थर्मल पावर स्‍टेशनच्‍या प्रवेशव्‍दारापासून कोराडी तलावावरील पूलापर्यंत 2 कि.मी. लांबीच्‍या उड्डानपुलाचे 200 कोटी रूपयाचे तरतुदीने बांधकाम, इत्यादी कामांचा समावेश आहे.

श्री. गडकरी यांनी यावेळी इतर विकासकार्यांचीही माहिती उपस्थितांना दिली.मनिषनगर ते आंतरराष्‍ट्रीय विमानतळापर्यंत क्रांकीटचा लिंकरोड बांधून दक्षिण नागपूरातील नागरिकांना विमानतळाकडे येणे सोयीस्‍कर ठरेल. मनिषनगरच्‍या उड्डाण पुलाकरीता मुंबई विमानतळाचे डिझाईन तयार करणा-या एल. अॅड टी. कंपनीच्‍या वास्‍तुविषारदांना सांगितले असून या संरचनेमुळे कोणत्‍याही नागरिकांना बांधकामामूळे बेघर होण्‍याची पाळी येणार नाही, असेही त्‍यांनी आवर्जुन सांगितले.


मिहानमध्‍ये एच.सी.एल. कंपनीतर्फे 2,000 अभियंताची नियुक्‍ती होणार असून 50 वर्षाच्‍या आपल्‍या कार्यकाळात आपण नागपूरसह विदर्भातील 50,000 हजार युवकांना मिहानमध्‍ये रोजगार देण्‍यास प्रयत्‍नशील राहणार, असेही यावेळी ते म्‍हणाले. आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतक-यांना दिलासा देणा-या राज्‍यशासनाच्‍या 34,000 कोटीच्‍या कर्जमाफीच्‍या संवेदनशील निर्णयामूळे तसेच 5 लक्ष शेतक-यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी दिल्‍याने शेततक-यांची ख-या अर्थाने कर्जमुक्‍ती झाली आहे, असे सांगून त्‍यांनी या निर्णयाबद्दल राज्‍यशासनाचे आभार मानले.

महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाच्‍या माध्‍यमातून जी कामे हाती घेतली जात आहेत, त्‍यामूळे नागपूरचा चेहरा मोहरा बदलून हे शहर एक आंतरराष्‍ट्रीय शहर म्‍हणून उदयास येईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. महाराष्‍ट्रात गेल्‍या 70 वर्षात 6,000 किमीचे राष्‍ट्रीय महामार्गाची कामे झालीत तर गेल्‍या 5 वर्षात 22,000 किमीची राष्‍ट्रीय महामार्ग महाराष्‍ट्रात होणार आहेत, असेही त्‍यांनी सांगितले. या विकास कार्यासोबतच महाराष्‍ट्रातील शेतक-यांना अडचणीतून मुक्‍त करण्‍यासाठी देशात प्रथमच 34,00 हजार कोटीच्‍या कर्जमाफीचा निर्णय महाराष्‍ट्र शासनाने घेतला, याकडे त्‍यांनी लक्ष वेधले, कर्जमाफी हा अंतिम उपाय नसून शेतीमध्‍ये अभूतपूर्व गुंतवणूक करून शेतक-यांना जगभरातून वित्‍तपुरवठा कसा होईल, या दृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहेत. ज्‍याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्‍वराज्य निर्माण करून जनतेचा स्‍वाभिमान जागृत केला त्‍याचप्रमाणे महाराष्‍ट्राचा शेतक-याचे स्‍वराज्‍य निर्माण करून त्‍याचा स्‍वाभिमान जागृत करण्‍याकडे आपले सरकार कार्य करेल, अशी ग्‍वाही त्‍यांनी यावेळी दिली.


नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकूळे यांनी नागपूरात 50 हजार कोटीच्‍या तरतूदीने होणारी कामे आता चालू झाली आहेत. यामूळे रस्‍ते अपघातमुक्‍त होतील, असे याप्रसंगी सोगितले.

या कार्यक्रमास स्‍थानिक लोकप्रतिनिधी, राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नागपूर महानगर पालिकेचे पदाधिकारी व स्‍थानिक नागरिक उपस्थित होते.