Published On : Sun, Aug 16th, 2020

-तर शहरांकडे रोजगारासाठी येणारे लोंढे थांबतील : नितीन गडकरी

‘स्वावलंबन’वर ई संवाद

नागपूर: आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मागास भागांचा आणि गावाखेड्यांचा औद्योगिक दृष्टीने विकास झाला तर रोजगार निर्मिती होऊन गावातच रोजगार उपलब्ध होईल व शहरांकडे येणार्‍या नागरिकांचे लोंढे थांबतील, असे मत केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

‘स्वावलंबन’ या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी मार्गदर्शन करीत होते. देशासमोर गरिबीची समस्या मोठी आहे. रोजगार नसल्यामुळे गरिबी निर्माण झाली आहे. रोजगार निर्माण झाला तर ही समस्या दूर होईल व सुखी, समृध्द व संपन्न भारताचे स्वप्न साकार होईल. शहरी भागातही समस्या आहेत, पण ग्रामीण भागात त्यापेक्षा अधिक समस्या आहेत. या असमतोलाचे कारण शोधावे लागेल. ग्रामीण भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न फारच कमी आहे. यापूर्वी 85 टक्के भारत हा ग्रामीण भागात वास्तव्यास होता, पण आता 60 टक्केच भारत ग्रामीण भागात राहातो. केवळ रोजगार नसल्यामुळेच ग्रामीण भागातील लोक शहरांकडे धाव घेत आहेत. बेरोजगारी असलेल्या या भागातील लोकांना स्वत:च्या पायावर उभे करावे लागेल. शासनाचे यासाठी प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.

अविकसित आणि मागास भागातही लहान व्यवसायी आणि लहान कारागिरांमध्ये कौशल्य आहे. त्यांचे कौशल्य अधिक विकसित करता आले पाहिजे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- कृषी मालावर आधारित अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने तयार होऊ शकतात. त्या उत्पादनांमध्ये कौशल्याची भर घालून त्यांचा दर्जा चांगला करता येईल. तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रीय शेतीचा अधिक विकास करता येणे शक्य आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच वापर करून उत्पादनाचा दर्जा अधिक चांगला करून त्याचे ब्रँडिंग करून त्या उत्पादनाला ई मार्केटमध्ये चांगला भाव मिळू शकतो. गावे सुखी, समृध्द, संपन्न होऊ शकतात.

जास्तीत जास्त लोकांच्या समूहाने अधिक उत्पादन करावे, ही आपली संकल्पना आहे, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- ग्रामीण भागातील लहान व्यवसायीसाठी सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्थांची संकल्पना आपण मांडली आहे. या संकल्पनेतून लहान व्यावसायिक व उद्योजक यांना पतपुरवठा करणे शक्य होणार आहे. परिणामी रोजगाराची निर्मिती होईल व गरिबी दूर करण्यास मदत होईल.

यासाठी गावांमध्ये स्वस्त घरे, पाणी, वीज, शौचालये, सेंद्रीय शेती यामुळे कृषी क्षेत्रातील अर्थव्यवस्था वाढू शकते. प्रदेशानुसार, जिल्ह्यानुसार तेथील स्थिती लक्षात घेऊन त्या लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. गावांना स्वावलंबी, स्वयंपूर्ण करणे, तेथील कारागिरांना प्रशिक्षण देता येईल, उच्च अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विकास करणे हीच आज आपली आवश्यकता आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.