Published On : Mon, Mar 30th, 2020

खासगी वैद्यकीय सेवा अबाधित ठेवा!

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश : अनावश्यक बंद ठेवल्यास कारवाई

नागपूर : ‘लोकडाऊन’ दरम्यान कुठलीही खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये. त्या अबाधित ठेवाव्या असे आदेश देत कुठलेही कारण नसताना बंद आढळलयास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

यासंदर्भात आज रविवारी (ता.२९) एक आदेश निर्गमित केला आहे. लॉकडाऊन हे लोकांनी घराबाहेर पडून कोरोना विषाणूचा प्रसार करू नये, यासाठी आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र शहरात अनेक खासगी दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.

खासगी दवाखाने, ओपीडी, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोर्स बंद ठेवण्याचे काहीही कारण नाही. अनेक ठिकाणी या सेवा बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात नागरिकांच्याही तक्रारी प्राप्त झाल्या.

त्यामुळे सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विनाकारण सेवा बंद ठेवल्यास साथरोग नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. वैद्यकीय सेवेशी संबंधित सर्व संघटनांना हा आदेश पाठविण्यात आला आहे.