Published On : Wed, Dec 22nd, 2021

ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा -विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

Advertisement

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करा

लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा
बालकांच्या उपचारासाठी नियोजन करा
दर मंगळवारी घेणार आढावा

Advertisement
Advertisement

नागपूर : ओमिक्रॉन विषाणूचा देशात व राज्यात संसर्ग आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका ओळखून लसीकरणाला गती द्यावी व शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सर्व अनुषंगिक बाबी प्रशासनाने सुसज्ज ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ओमिक्रॉन विषाणूवरील उपाययोजना व प्रशासनाचे नियोजन यासंदर्भात श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे तसेच उपायुक्त (महसूल) मिलींद साळवे, आरोग्य उपसंचालक संजय जैस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या डॉ. श्रीमती तायडे, आदी बैठकीला उपस्थित होते.

ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण 30 देशांत वाढत आहेत. तसेच देशात व राज्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोविड तपासणी अनिवार्य करण्यात यावी. लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमिक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे विभागातील प्रत्येक जिल्ह्याने लसीकरणाला गती देऊन शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे. पहिला डोस घेतलेल्या परंतु दुसरा डोस अपूर्ण असलेले व दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करण्यात यावे. कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. रेमडिसीव्हीअर, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर्स तसेच बालकांना लागणारे आय.व्ही.फ्ल्यूड्सचा पुरेसा साठा आरोग्य विभागाने उपलब्ध ठेवावा तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आतापासूनच सर्व साधनसामुग्री व आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करुन तशी तरतूद करावी. ओमिक्रॉन विषाणूचा धोका टाळण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेला टास्कफोर्स त्वरित गठित करावा व या टास्क फोर्समार्फत जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन व उपचार पद्धतीबाबत माहिती द्यावी, अशा सूचना श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी दिल्या.

आरटीपीसीआर लॅब श्रेणीन्नोत, आयसीयूचे बळकटीकरण तसेच लहान मुलांसाठी कक्ष उभारण्यासाठी ईसीआरपी-2 अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार ही कामे पूर्ण करण्यात यावी. कोव्हिड-19 साठी लागणारे आवश्यक साहित्य, औषधी, वैद्यकीय उपकरणे आदींच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन, खनिकर्म तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलांतर्गत प्राप्त निधीचा उपयोग करावा. प्रत्येक जिल्ह्याने फायर ऑडिटचे कामकाज पूर्ण करुन कार्यपूर्ती अहवाल सादर करावा. ओमिक्रॉन व्हेरिएंट विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याने यंत्रणा सुसज्ज ठेवून प्रत्येक बाबींची पूर्तता करुन ठेवावी. ‘कोविड प्रतिबंधात्मक नियमासंदर्भात व्यापक जनजागृती करावी. कोविड सद्य:स्थिती, अडी-अडचणी व उपाययोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement