Published On : Sat, Dec 30th, 2017

सचिन तेंडुलकर सहमालक असणा-या ‘स्मॅश’वर पालिकेने फिरवला बुलडोजर

Smash
मुंबई: कमला मिल कंपाऊंड परिसरात घडलेल्या अग्नितांडवानंतर जाग आलेल्या मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील बेकायदा बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. महापालिकेने शनिवारी लोअर परेल आणि वरळी परिसरातील चार रेस्टॉरंटसमधील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला.

महापालिकेने कारवाई केलेल्य़ामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहमालक आणि ब्रँड अॅम्बेसिडर असणा-या ‘स्मॅश’ या गेमिंग आणि मनोरंजन कंपनीचाही समावेश आहे. महापालिकेने ‘स्मॅश’वर बुलडोझर चालवत ते पाडून टाकले. स्मॅशचे बांधकाम अनधिकृत असल्यानेच ही कारवाई करण्यात आली. क्रिकेट, फुटबॉल, गो-कार्टिंग, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि संगीत असे विविध क्रीडा आणि मनोरंजनाचे प्रकार स्मॅशमध्ये ठेवण्यात आले होते.

कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीमधील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या अग्नितांडवामध्ये 14 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला.

दरम्यान कमला मिल आग प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. एमआरटीपी अंतर्गत कमला मिलचे मालक रमेश गोवानी, मोजोसचे संचालक युग पाठक आणि ड्यूक थुली तसंच वन अबोव्हचे संचालक क्रीपेश संघवी, अभिजीत मानकर आणि रघुवंशी मील पी २२ चे संचालक शैलेंद्र सिंघ यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त एस जयकुमार यांनी दिली आहे.

वरळी आणि लोअर परेलमधील स्कायव्हयू कॅफे आणि सोशल या रेस्टॉरंटसनी मूळ स्ट्रक्चरमध्ये बदल करुन बेकायदा बांधकामे केली होती अशी माहिती जी-दक्षिण विभागाच्या महापालिका अधिका-यांनी दिली. ही बांधकामे पाडण्यात आली. वरळीच्या रघुवंशी मिल कंपाऊंडमधील पनाया आणि शिसा स्काय लाऊंजने उभारलेल्या अनधिकृत शेडस पाडण्यात आल्या आहेत. आज दिवसभर अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरु राहणार आहे. कमला मिल दुर्घटनेनंतर महापालिकेने तडकाफडकी पाच अधिका-यांचे निलंबन केले.

‘मोजोस ब्रिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या पबला लागलेल्या आगीप्रकरणी महापालिकेच्या पाच अधिका-यांचे तत्काळ निलंबन तर जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या पबमधील बेकायदा बांधकाम, आग प्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल येत्या १५ दिवसांमध्ये सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समिती बैठकीत दिली.

गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत उमटले.

कमला मिल कम्पाउंडमध्ये असे अनेक रेस्टॉरंट असून बेकायदा बांधकामही मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला. साकीनाका येथे १८ डिसेंबर रोजी फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा मृत्यू झाला होता. महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदा बांधकाम आणि आगीशी खेळ सुरू आहे. त्यामुळे अशा घटनांसाठी विभागातील अधिकारी आणि साहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरावे, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी लावून धरली.