
नागपूर: आदिवासी व ग्रामीण समाजाच्या आरोग्य आणि शिक्षण सुरक्षा वाढवण्यासाठी कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था पुढाकार घेत असून, त्यांनी एक लाख आदिवासी महिलांसाठी जीवन विमा योजना जाहीर केली आहे. केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सेवा टेक लिमिटेडच्या सहकार्याने आदिवासी क्षेत्रातील आर्थिक परिवर्तनाचा नवा मार्ग मोकळा करत शिक्षक-पर्यवेक्षकांना व्हिसा कार्ड देण्यासही सुरुवात झाली.
मानकर ट्रस्टने नुकत्याच त्यांच्या विशेष बैठकीत ‘2026 परिवर्तन रोडमॅप’ सादर केला, ज्यात आरोग्य, शिक्षण, मनोरंजन आणि आर्थिक कल्याण या क्षेत्रांचा समन्वय साधण्यात आला आहे. या वेळी, संस्थेचे अध्यक्ष श्री अतुल शिरोडकर, डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार संजय पुराम, तसेच अनेक कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
महिलांच्या जीवन विम्याने कुटुंबांसाठी सुरक्षा कवच
संस्थेच्या आगामी योजनांमध्ये आदिवासी महिलांसाठी जीवन विमा योजना सर्वात महत्त्वाची मानली गेली आहे. आजार किंवा अकाली मृत्यूच्या परिस्थितीत आर्थिक संकटातून कुटुंबांना सावरण्यासाठी ही योजना आधारभूत ठरणार आहे. पहिल्या टप्यात संस्थेतील ३३ हजार विद्यार्थ्यांच्या मातांना विमा सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आदिवासी भागातील शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणेची गरज व्यक्त करत, सामाजिक जबाबदारीची मागणी केली.
मेडिसर्व्ह डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्मने आरोग्यसेवेत नवा टप्पा
आदिवासी लाभार्थ्यांसाठी विकसित केलेल्या मेडिसर्व्ह डिजिटल हेल्थ अॅपद्वारे कुटुंबांच्या आरोग्य नोंदी, आजारांचे जलद निदान व योग्य रुग्णालयात रेफरल यांसारख्या सुविधा उपलब्ध होतील. कमी इंटरनेट असलेल्या भागांतही या अॅपचा प्रभावी उपयोग शक्य आहे.
शिक्षण व मनोरंजन क्षेत्रातील उपक्रम
शिक्षण क्षेत्रात अभ्यासक्रम मानकीकरण, शिक्षकांच्या देखरेखीची प्रणाली तसेच टाटा स्टीलच्या सहकार्याने व्यावसायिक प्रशिक्षण राबवण्याचे नियोजन आहे. नागपूरमध्ये KISS संस्थेच्या सहकार्याने आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचा उपक्रमही पुढे चालू आहे. याशिवाय एकल इंटरटेंमेंट थिएटर्स सुरु करून आरोग्य, स्वच्छता व सामाजिक जागृती करण्याचे कामही करण्यात येणार आहे.
सेवा नीती कार्डद्वारे आर्थिक सुरक्षा
धापेवाडा येथे आयोजित बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सेवा नीती कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्डावर ₹1 लाखांचा वैयक्तिक अपघात विमा, सामान्य रुग्णालयात आणि ICU मध्ये रोख लाभ, हवामानाधारित विमा, औषधांवर कॅशबॅक आणि शेतीसाठी सवलतीचे अनेक लाभ दिले जाणार आहेत. सेवा टेक लिमिटेडच्या CEO रितू सोनी यांनी मानकर ट्रस्टसोबतच्या भागीदारीचा आनंद व्यक्त केला.
श्री नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटले, “गावे, शेतकरी आणि ग्रामीण समाज हे भारताचे हृदय आहेत. त्यांचा विकास म्हणजे विकसित भारत.” मानकर ट्रस्ट आणि सेवा टेक लिमिटेड यांचे सहकार्य ग्रामीण विकासाला नवे आयाम देणार असल्याचे त्यांनी ठामपणे व्यक्त केले.
ही योजना आदिवासी समाजासाठी सामाजिक सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि आत्मसन्मानाचा पाया ठरणार असून, पुढील काळात या उपक्रमाचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.








