Published On : Mon, Nov 18th, 2019

पद्मश्री के.के. मोहम्मद यांचा मनपाद्वारे सत्कार

Advertisement

नागपूर: प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ आणि अयोध्येतील राम मंदिराचे पुरातत्वीय शोध घेणाऱ्या चमूचे सदस्य पद्मश्री के. के. मोहम्मद यांचा नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी (ता.१८) महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवन येथे महापौर कक्षात सत्कार करण्यात आला. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते के.के. मोहम्मद यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह, तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना नागपूरच्या जैवविविधतेवर आधारीत कॉफी टेबल बुक भेट देण्यात आले.

यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर सहकार्यवाह रवींद्र बोकारे, महानगर प्रचारक क्षितीज गुप्ता, ब्रिजेश मानस, मंथन या संस्थेचे रोहन पारेख, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, संजय मेंढुले प्रामुख्याने उपस्थित होते.

के.के. मोहम्मद यांनी महाल येथील नगरभवनची पाहणी केली. महापौर नंदा जिचकार यांनी नागपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. के.के.मोहम्मद यांनीही नागपूर शहराची स्तुती करत नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली.

नागपूर महानगरपालिकेने आपली दखल घेत केलेला सत्कार हा आपल्यासाठी मानाचा आहे. याबद्दल नागपूर महानगरपालिकेचे आपण ऋणी असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.