मुंबई : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा सध्या लांबली असून, महिन्याच्या अखेरचे काही दिवसच उरले आहेत.
यापूर्वीही जून महिन्याचा हप्ता उशिरा मिळाला होता, त्यामुळे जुलै महिन्यातही त्याच प्रकारची परिस्थिती उद्भवेल का, असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
ही योजना राज्य सरकारने महिला सक्षमीकरण आणि आर्थिक मदतीसाठी सुरू केली असून, पात्र महिलांना दर महिन्याला थेट त्यांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा केले जातात. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम महिलांसाठी उपयुक्त ठरत आहे.
दरम्यान, लाभार्थ्यांची पात्रता तपासण्याचं काम सरकारने गतीने सुरू केलं आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक आहे, किंवा ज्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, तसेच चारचाकी वाहन धारक महिला, त्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत महिलांना आपले बँक खाते आणि मोबाईल नंबर अपडेट ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून रक्कम जमा झाल्यावर त्याची एसएमएसद्वारे माहिती मिळू शकेल.