
नागपूर : हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सण गुडीपाडवा नागपूरात यंदा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो नागरिकांसोबत भव्य शोभायात्रेत सहभागी होत राज्यवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या पवित्र दिवशी नागपूरातील शोभायात्रेत सहभागी होणे हा आनंददायी अनुभव आहे. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात गुडीपाडव्याचे आयोजन केले जाते आणि नागरिकांचा उत्साह नेहमीच पाहण्यासारखा असतो, असे त्यांनी नमूद केले.
शहरात सर्वत्र भगव्या रंगाची छटा पाहायला मिळत होती. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण पारंपरिक पोशाखात उत्सवात सहभागी झाले होते, त्यामुळे नागपूरात सणाचा अनोखा उत्साह आणि सांस्कृतिक वैभव अनुभवायला मिळाले.
गुडीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिवत गुडीची पूजा करून नववर्षाचे स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करण्यात आलेल्या या सोहळ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या शोभायात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः रोप मल्लखांबच्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कलाकारांनी आपल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत या उत्सवाचा आनंद घेत नागरिकांशी संवाद साधला.
गुडीपाडव्याच्या निमित्ताने नागपूर शहर सणाच्या रंगात न्हाऊन निघाले असून, विविध भागांतील सजावट, पारंपरिक संस्कृतीची झलक आणि नागरिकांचा उत्साह यामुळे शहर खऱ्या अर्थाने उत्सवाचे केंद्र बनले होते.








