– ॲड.धर्मपाल मेश्राम यांची माहिती : अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आयोजन
नागपूर. पदवीधर मतदार संघ नागपूर विभागाचे भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ नागपूर शहर अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पदवीधरांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळ्याव्याच्या आयोजन आणि यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करा, असे आवाहन भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केले.
पदवीधर उमेदवार महापौर संदीप जोशी यांच्या प्रचारासंदर्भात नुकतीच उत्तर नागपूरमधील कमाल चौक येथील समाजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोकजी मेंढे, उत्तर मंडळ अध्यक्ष संजय चौधरी, अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड, नगरसेवक महेंद्र धनविजय, रविंद्र डोंगरे, रमेश फुले, वैशाली साखरे, ज्योती जनबंधु, नेताजी गजभिये उपस्थित होते.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला अवघे ११ दिवस शिल्लक आहेत. अशा स्थितीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान करण्यासाठी जाण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे. यासाठी पदवीधरांना एकत्रित आणून त्यांना निवडणुकीची प्रक्रिया, नियम आणि सर्व तांत्रिक बाबींची माहिती देणेही गरजेचे आहे. यासाठी येत्या २८ नोव्हेंबरला नागपूर शहरामध्ये अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पदवीधरांचा भव्य मेळावा आयोजित करण्याबाबत तयारी सुरू करावी, असे ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.
पक्षातर्फे संदीप जोशी यांच्या रूपात पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून शंभर टक्के योग्य उमेदवार दिले आहेत. तरुण, बेरोजगार, शिक्षक, पदवीधरांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी प्रसंगी संघर्ष करण्यासाठीही संदीप जोशी कधीच मागे हटणार नाही, हा विश्वास आहे. याशिवाय सामाजिक प्रश्नांची जाण असणारा हा नेता पदवीधरांसह संपूर्ण विभागातील अनेक प्रश्नांना मार्गी लावेल, असाही विश्वास भाजप प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.
बैठकीच्या आयोजनासाठी शंकर मेश्राम, रोहन चांदेकर यांनी परिश्रम घेतले. संचालन विराग राऊत यांनी केले. बैठकीला मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
