Published On : Sat, Aug 31st, 2019

जिजाऊ शोध संस्थान प्रकल्प दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र होणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Advertisement

‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन प्रकल्पाचे भूमिपूजन

प्रकल्पासाठी केंद्र व सरकारकडून २० कोटीची भरीव मदत

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे व राज्य शासनाच्या निधीमधून तयार होणारे ‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन प्रकल्प हे नागपूर शहरातील बचत गटांना उद्योगाद्वारे बळ देणारे ठरणार आहे. या प्रकल्पाद्वारे महिलांना उद्योगाचे प्रशिक्षण देउन त्यांच्याद्वारे निर्मित उत्पादनांना बाजार उपलब्ध करुन देण्याची सुद्धा गरज आहे. महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. कोणतेही कार्य अतिशय बारकाईने करण्याची कला महिलांमध्ये आहे. त्यामुळे कोणतेही उत्पादन तयार करताना त्याचा दर्जा, पॅकेजींग व मार्केटिंग याकडे विशेष लक्ष देउन योग्य कार्य केल्यास मनपाचा हा पथदर्शी प्रकल्प दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग १५ मधील शंकर नगर येथील जिजामाता सभागृहाजवळ शुक्रवारी (ता.३०) ‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. राज्य महिला आयोगाच्या प्रज्वला योजने अंतर्गत बचत गटातील महिलांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वित्त आणि नियोजन, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्य उत्पादन शुल्क तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम वन, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, रामटेकचे आमदार मलिक्कार्जुन रेड्डी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, सुक्ष्म, लघु व मध्य उद्योग संस्थान नागपूरचे संचालक पी.एस. पार्लेवार, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेविका रूपा राय, नगरसेविका परिणीता फुके, नगरसेविका वर्षा ठाकरे, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेविका चेतना टांक, नगरसेवक सर्वश्री सुनील हिरणवार, संजय बंगाले, नागेश सहारे, भगवान मेंढे, प्रमोद कौरती, निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे आदर्श आहेत. राज्याच्या आदर्श राजाला घडविण्याचे महत्वाचे कार्य राजमाता जिजाऊ यांनी केले. त्यांच्या नावाने नागपूर शहरामध्ये महिलांसाठी ‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन प्रकल्प साकारत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांनी औद्योगिकदृष्ट्या व त्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होउन अनेक छत्रपती शिवाजी महाराजांसारखे समाजासाठी काही करण्याच्या भावनेने कार्य करणारे अनेक शिवाजी घडवावे, असे आवाहनही ना. नितीन गडकरी यांनी केले. बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणा-या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारे तडजोड करू नका. दर्जेदार उत्पादन हेच सक्षमीकरणाच्यादृष्टीने महत्वाचे पाउल ठरणार आहे, असा मंत्रही त्यांनी उपस्थित बचत गटाच्या महिलांना दिला.

प्रदर्शन केंद्रासाठी १० कोटी निधी
‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन प्रकल्पाद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे व त्याचे मार्केटिंग करणे हे मोठे आव्हान आहे. तयार उत्पादनांच्या विक्रीमधूनच महिलांच्या कार्याला ख-या अर्थाने न्याय मिळणार आहे. त्यामुळे या उत्पादनांची ग्राहकांशी ओळख व्हावी, त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग व्हावे यासाठी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने याच प्रकल्पामध्ये प्रदर्शन केंद्र साकारण्यात यावे. या केंद्रामध्ये ७०० ते ८०० लोकांच्या बसण्याची व्यवस्था असलेले सभागृह, अत्याधुनिक उपकरणांचा समावेश, डिजीटल स्क्रीन, राउंड टेबल कॉन्फरन्स हॉल, ई-लायब्ररी, सौर उर्जा पॅनल असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण प्रदर्शन केंद्र साकारण्यात यावे. या केंद्रासाठी वेगळा १० कोटी निधी मंत्रालयातर्फे पुरविण्यात येईल, अशी घोषणाही ना. नितीन गडकरी यांनी केली. याशिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यासाठी सर्व महिला नगरसेविकांनी आपापल्या प्रभागात महिला प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावे यासाठी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाद्वारे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन करीत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयाचे जबाबदारी किर्तीदा अजमेरा यांना देण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.

महिला उद्योजिका भवन प्रकल्पासाठी आणखी १० कोटी : ना. सुधीर मुनगंटीवार
राज्यामध्ये उद्योग भवनाद्वारे विविध कार्य करण्यात येतात. मात्र महिलांसाठी विशेष असे उद्योग भवन राज्यात कुठेच नाही. महापौर नंदा जिचकार यांनी हा प्रकल्प नागपूरात सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. महिलांसाठी स्वतंत्र उद्योग भवन राज्यात प्रथमच साकारला जात आहे. या प्रकल्पासाठी १७ कोटी ४१ लक्ष ९४ हजार ६५६ रुपये निधी प्रस्तावित आहे. आधी यासाठी राज्य सरकारकडून १० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. मात्र महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणा-या या प्रकल्पाला निधी कमी पडू नये यासाठी राज्य सरकारकडून आणखी १० कोटी असा एकूण २० कोटी निधी प्रकल्पासाठी देण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे वित्त आणि नियोजन, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

केंद्र व राज्य सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रत्येक योजनांचा फायदा महिलांना व्हावा यासाठी अशा योजनांच्या पूर्ततेसाठी सदैव तत्पर आहोत. २०२५ पर्यत महाराष्ट्र राज्याची ‘वन ट्रिलीयन डॉलर’ अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष आहे. मात्र महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे महिलांसाठी असे उद्योग भवन महत्वाची भूमिका बजावणार आहेत. उद्योग भवनाच्या माध्यमातून महिला प्रगती साधतील तेव्हाच याच्या निर्मितीला फलित मिळेल, असेही ते म्हणाले.

आज अगरबत्ती, टूथपिक, अंडी यासारखी छोटी उत्पादने बाहेर राज्य अथवा चीन, कोरीया अशा देशांमधून आयात करावी लागतात. अशा वस्तूंच्या उत्पादनांसाठी महिला बचत गटांना प्रशिक्षण देउन त्यासाठी त्यांनी आर्थीक मदत करुन बाहेरील देशातील आयात बंद करता येउ शकेल, असे सांगताना अनेक उदाहणाद्वारे त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाची माहिती दिली.

औद्यागिक क्षेत्रातही महिला प्रगती साधतील : ना.चंद्रशेखर बावनकुळे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व महापौर नंदा जिचकार यांच्या पुढाकराने महिलांच्या उत्थानासाठीचे मोठे पाउल आहे. या प्रकल्पाद्वारे महिला प्रत्येक क्षेत्राप्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातही प्रगती साधुन नागपूर शहराचे नाव जगात आणखी मोठे करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी प्रकल्पाची स्तुती केली. महिलांच्या निर्णयक्षमता आणि नवनिर्मिती क्षमतेमुळे उत्तम उत्पादनाचा लाभ घेता येणार आहे. महिला बचत गटाद्वारे निर्मित उत्पादनांना याद्वारे मोठे मार्केट उपलब्ध होउ शकेल, असा आशावाद व्यक्त केला.

शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हा : विजया रहाटकर
आज केंद्र आणि राज्य सरकारकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांना सक्षम करणे हे सरकारचे कार्य आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला केंद्री धोरण राबवून महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक कायदे आहेत. शासनाच्या या योजना आणि कायदे यांचा योग्य अभ्यास करून सरकारच्या योजनांचा योग्य लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

राज्य महिला आयोगाच्या प्रज्वला योजने अंतर्गत बचत गटातील महिलांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी शहरातील बचत गटातील महिलांना महिला विषयक कायद्याची माहिती, महिला विषयक शासनाच्या विविध योजना आदींची माहिती दिली. राज्यभर कार्यक्रमांद्वारे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर महिलांना माहिती देत असून नागपूरात त्यांचा शंभरावा कार्यक्रम पार पडला हे विशेष. महिलांना राज्यात पाच लाख महिला बचत गट असून एक कोटी महिला यामध्ये कार्यरत आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये १६२१ बचत गट असून यापैकी १५०० बचत गटांना मनपातर्फे फिरता निधी देऊन सक्षम करण्यात येत आहे ही अभिनंदनीय बाब असून यासाठी त्यांनी मनपाचे अभिनंदन केले.

भगिनींनो पुढे या, धैर्याने वाटचाल करा : महापौर नंदा जिचकार
आपल्या शहरातील महिलांनी सर्वच स्तरामध्ये प्रगती साधावी त्यांच्या अडचणींपुढे त्या हिंमतीने उभ्या राहाव्यात यासाठी त्यांना बळ मिळण्यासाठी काही करण्याची इच्छा सुरूवातीपासूनच होती. त्यामधून महिलांच्या सक्षमीकरणाला कळ देणा-या ‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवनची संकल्पना पुढे आली. यासाठी राज्य सरकारने केलेल्या मदतीतून हे स्वप्न आता पूर्ण होत आहे, असे महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

आज केंद्र व राज्य सरकारने महिलांच्या उत्थानासाठी अनेक योजना आणल्या आहेत. महिलाही या योजनांचा लाभ घेउन पुढे येत आहेत. उद्योगाची परिभाषा बदललेली आहे. केवळ औद्योगिक शिक्षण घेउनच उद्योग करता येतो ही समजूत मागे पडली आहे व त्यातून महिलांना सक्षमीकरणाचा नवा मार्ग मिळाला आहे. मात्र यामध्ये येणा-या अडचणी मागे घेउन येतात. आज अनेक अडथळ्यांमुळे बचत गट बंद पडत आहेत. मार्गदर्शनाअभावी हे बचत गट उद्योगामध्ये परिवर्तीत होउ शकत नाही. अशा उद्योगांना मार्गदर्शन आणि व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन महत्वाची भूमिका बजावणार आहे. महिला जेव्हा स्वत:चे निर्णय स्वत: घेईल तेव्हाच ती सक्षम होईल. त्यामुळे भगिनींनी पुढे या, धैर्याने वाटचाल करा, अवघे आकाश आपलेच आहे, अशा शब्दांमध्ये महापौर नंदा जिचकार यांनी उपस्थित महिलांना प्रोत्साहित केले.

कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक संजय बंगाले यांनी केले. यावेळी शहरातील विविध भागातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.