नागपूर: शहरातील जरीपटका पोलिसांनी वेगवान कारवाई करत बुद्धांच्या पितळी मूर्ती आणि रोकड चोरीप्रकरणी एका मुख्य आरोपीला गजाआड केले. ही घटना ७ ऑगस्टच्या रात्रीपासून ८ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत घडली. शहरातील एका बुद्ध विहाराच्या मुख्य लोखंडी गेटाला दोन कुलुपे लावून ते बंद करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ६.३० वाजता प्रार्थनेसाठी विहारात आलेल्या सुशमा बगडे या महिला व्यवस्थापिकेने गेटवरील कुलुपे तोडलेली पाहिली. आतमध्ये २.५ फूट उंचीची गौतम बुद्धांची पितळी मूर्ती (किंमत ₹१५,०००) आणि दानपेटी गायब होती. विहाराच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली फुटलेली दानपेटी सापडली, मात्र त्यातील सुमारे ₹६,००० रोकड चोरीला गेली होती. एकूण चोरी गेलेल्या मालाची किंमत ₹२१,००० एवढी होती.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख सागर बाबन बोरकर (रा. नागबर्ड, गोधनी, पोलीस स्टेशन माणकापूर) अशी पटवली. माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने एका साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनंतर लपवून ठेवलेली मूर्ती पंचनामा करून जप्त करण्यात आली. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (झोन-५) निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवान बांदीवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, एपीआय आशिष मोरखेडे, पीएसआय मारोती जांगिळवाड व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे.