Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jul 25th, 2020

  ‘जनता कर्फ्यू’ ला प्रतिसाद देणाऱ्या नागपूरकरांना मनापासून सलाम!

  महापौर संदीप जोशी यांनी मानले जनतेचे आभार : पुढेही अशीच काळजी घेण्याचे आवाहन : आजसुध्दा जनता कर्फ्यू

  नागपूर: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागपूर शहरात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली. महानगरपालिकेत झालेल्या लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांच्या बैठकीत लॉकडाऊन टाळण्याचेच मत मांडण्यात आले. त्यातून नागपूर शहरात शनिवार (ता. २५) आणि रविवारी (ता.२६) ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा करण्यात आले. आपल्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने ‘जनता कर्फ्यू’चे काटेकोर पालन करीत भरभरून प्रतिसाद दिला. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी दाखवलेल्या सामंजस्याची तुलना नाही. आपली नैतिक जबाबदारी ओळखून ‘जनता कर्फ्यू’ला उत्तम प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक नागपूरकराला मनापासून सलाम, अशा शब्दांत महापौर संदीप जोशी यांनी जनतेचे आभार मानले.

  शहरात दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केल्यानंतर शनिवारी (ता.२५) स्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी संपूर्ण शहरात फिरून पाहणी केली. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांना समझ्‍ दिली, ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांना मास्क दिले, गरजूंना अन्नाचे पॉकिट दिले, अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी गर्दी दिसली तिथे शारिरीक अंतर पाळण्याचे आवाहनही केले. या पाहणी दौऱ्यात बडकस चौक परिसरात आमदार गिरीश व्यास, जरीपटका भागात आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेविका प्रमिला मंथरानी उपस्थित होते.

  प्रारंभी शंकर नगर चौकात महापौरांनी भेट दिली. याप्रसंगी बजाज नगर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंग क्षीरसागर त्यांच्या चमूसह उपस्थित होते. शंकर नगर चौकातून जाणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची चौकशी करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरणाऱ्यांना घरीच थांबण्याचे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले.

  यानंतर झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, सदर, जरीपटका, इंदोरा, इतवारी, पाचपावली, गांधीबाग, महाल, यशवंत स्टेडियम शहरातील या आणि अशा सर्वच बाजाराच्या ठिकाणी महापौरांनी भेट देऊन पाहणी केली.

  ‘जनता कर्फ्यू’ म्हणजे लॉकडाऊन नाही. ही आपल्याला आपली मानसिकता बदलवण्याची संधी आहे. दोन्ही दिवस नागपूरकरांनी असाच प्रतिसाद कायम ठेवावा. काही नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे त्यांच्या घरातील जेष्ठ आणि लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या ‘जनता कर्फ्यू’नंतरही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. बाहेर जाण्याची वेळ आल्यास मास्क अवश्य लावावा, सॅनिटायजरचा वापर करावा आणि महत्त्वाचे म्हणजे शारीरिक अंतर राखले जाईल याची पुरेपूर काळजी घ्यावी. शासनाच्या कोव्हिड संदर्भातील दिशानिर्देशांचे आपण सर्व मिळून पालन केल्यास आपल्या शहरात लॉकडाऊनची गरजच पडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना विरुद्धच्या या लढाईत असेच सहकार्य करीत आपल्या सवयी बदलून घरीच राहावे, असेही आवाहन यावेळी महापौर संदीप जोशी यांनी जनतेला केले.

  शहराचे विविध भागात आमदारांनी आणि मनपा पदाधिकारी व नगरसेवकांनी नागरिकांना जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले होते त्यांला नागरिकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळाला.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145