Published On : Thu, Mar 29th, 2018

महाराजबागेतील जाई वाघिणीचा मृत्यू

नागपूर: येथील महाराजबाग प्राणीसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या जाई वाघिणीचा आज सकाळी मृत्यू झाला. गेल्या सहा महिन्यांपासून ही वाघीण मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही.

आईपासून दुरावलेल्या जाई व जुई या दोन वाघिणींना २००८ साली चंद्रपूरच्या जंगलातून आणण्यात आले होते. तेव्हापासून गेली दहा वर्षे या दोघी महाराजबाग प्राणीसंग्रहालयात होत्या. यापैकी जुईचा मृत्यू मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात झाला होता. जुईच्या मृत्यूनंतर जाई हेच महाराजबागेतील आकर्षणाचे प्रमुख केंद्र होते.

जाईला मूत्रपिंडाचा विकार असल्याचं निदान काही दिवसांपूर्वी झालं. त्यातच तिला सापानंही दंश केला होता. त्यातूनही काही काळ ती सावरलीही होती. मात्र, मागील तीन दिवस जाईचं खाणंपिणं खूपच कमी झालं होतं. त्यामुळं तिची प्रकृती ढासळली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला,’ अशी माहिती महाराजबागेतील डॉ. सुनील बावस्कर यांनी दिली. जाईच्या मृत्यूमुळं प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.