Published On : Fri, Jan 11th, 2019

पेट्रोलचे नाव बदलायलाही हे मागेपुढे पाहणार नाही – छगन भुजबळ

Advertisement

रत्नागिरी : सध्या नावं बदलण्याचा जमाना आहे. आणि आता पेट्रोलचेही नाव आता बदलणार असून त्याचे नाव पंडीत दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ असे ठेवले तर यात नवल वाटायचे कारण नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी लगावला.

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून इतिहासाचा तज्ज्ञ शक्तीकांत दास आणला आहे. इथे इतिहास लिहायचा आहे का? इथे देशाची अर्थव्यवस्था सांभाळायची आहे. अक्षरश :अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला.

Advertisement
Advertisement

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी या सरकारकडे पैसे नाहीत परंतु वायफाय देण्यासाठी या सरकारकडे करोडो रुपये आहेत. आता मला सांगा तुम्हाला वायफाय हवा की, भाकरी हवी असा सवाल जनतेला भुजबळ यांनी केला.

कशाला देवांच्या जाती काढता… देवांना तरी सोडा – अजित पवार

मारुतीची आज ‘जात’ काढली जात आहे… अरे कशाला देवांच्या जाती काढता… निवडणूका आल्या की यांना प्रभू रामचंद्र आठवलाच… प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला…आता शिवसेना राममंदिर बांधायला निघाली आहे, अरे साडेतीन वर्षे झोपला होतात का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी शिवसेनेला केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा खेड येथे पार पडली. यावेळी अजितदादा पवार यांनी शिवसेनेवर तोफ डागली.

आज गोत्र विचारलं जात आहे. विकासाचा आणि गोत्राचा काही संबंध आहे का? जात, पंथ, गोत्र काढून लोकांना भावनिक बनवायचं हेच सुरु आहे. आज जाहीर केले ते देता येत नसल्याने आता हे उद्योग सुरू आहेत असेही अजितदादा पवार म्हणाले.

शहरांची नावे बदलली जात आहेत. नावे बदलून समस्या सुटणार आहे का? नवीन शहरे करा. यातून काय साध्य केले जात आहे असा सवालही अजितदादा पवार यांनी केला.

निवडणूका नसतानाही किंवा आचारसंहिता नसतानाही पोलिस शूटींग करत आहेत. ही काय लोकशाही आहे का? कुणाच्या आदेशावर हे केले जात आहे. आम्ही सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही परंतू मागच्या दाराने ही आणीबाणी आणली जात आहे हा भाजपचा डाव आहे असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.

लोकांची फसवणूक करणाऱ्या सरकारला घरी बसवा – धनंजय मुंडे
येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन करण्याचा निर्धार केला असून जनतेला फसवणाऱ्या भाजप सरकारला घरी बसवण्याचे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खेड येथील जाहीर सभेत केले.

धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि अनंत गीते यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. रामदास कदम यांना ‘दाम’ दास कदम अशी उपमा दिली.रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा आणि परिवर्तन घडवा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.या सभेत रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात सेनेच्या कारभारावर जोरदार टीका केली.

जाहीर सभेच्या अगोदर खेड शहरात बैलगाडीतून अजितदादा पवार, सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडी हाकण्याचे काम विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.कार्यक्रमात आमदार संजय कदम यांनी शिवसेना नेते आणि मंत्री रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. तर आमदार भास्करराव जाधव यांनी भाजप-शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली.

अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी भाजप शिवसेनेच्या कारभारावर जोरदार प्रहार केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार भास्करराव जाधव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विदया चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, आमदार संजय कदम, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement