नागपूर : कळमना येथील पवनगाव परिसरात खून करून फेकून दिलेल्या मृतदेहाची पाच दिवस उलटूनही ओळख पटलेली नाही. यामुळे अद्यापही हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
पवनगाव ते कामठी या मार्गावर भूषण चौधरी यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात 13 एप्रिल रोजी सकाळी 28 ते 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ओळख लपवण्यासाठी त्याच्या शरीरावर आरोपीने कपडेही ठेवले नाही. रात्रीच त्या युवकाची हत्या झाल्याची माहिती आहे.
माजी सरपंचाच्या माहितीवरून कळमना पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून खुनाचा गुन्हा दाखल केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. सर्वांनी ओळख पटवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा तरुण बाहेरचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह येथे आणून फेकण्यात आला. केवळ व्यावसायिक गुन्हेगारच ही युक्ती वापरतात, अशी पोलिसांना शंका आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे अधिकारीही तपासात गुंतले असून, त्यांनाही वारंवार अपयशच मिळत आहे. त्यामुळे . कळमना पोलीस आणि गुन्हे शाखेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
– रविकांत कांबळे