नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये मानांकीत खेळाडूला पराभवाचा धक्का देत इरशाद अहमद ‘चॅम्पियन’ ठरला. महिला गटात दिप्ती बाथो यांनी विजेतेपदावर मोहोर उमटविली. खदान येथील सभागृहामध्ये ही स्पर्धा पार पडली.
खासदार क्रीडा महोत्सवामध्ये तृतीय मानांकीत गुरुचरण तांबे आणि चवथा मानांकीत इरशाद अहमद यांच्यात पुरुष एकेरीची अंतिम लढत झाली. राय क्लबच्या इरशाद अहमदने २२-२१ अशा नजीकच्या फरकाने पहिला सेट जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये ओम क्लबच्या गुरुचरण तांबेचा इरशादच्या आक्रमक खेळीपुढे निभाव लागला नाही व इरशादने दुसरा सेट २५-५ अशा मोठ्या फरकाने जिंकून स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.
उपांत्य फेरीत इरशादने अग्रमानांकीत आरसीएच्या नीलेश जांभुळकर चा २३-९, २५-७ ने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर गुरुचरण तांबेने द्वितीय मानांकीत व्हीबीएस निखील लोखंडेला २५-२, २५-१२ ने पराभवाचा धक्का देत इरशाचे आव्हान स्वीकारले होते.
महिलांच्या एकेरी स्पर्धेत राय क्लबच्या दिप्ती बाथो यांनी राय क्लबच्या डिम्पल परातेला १२-२२, २५-१५, २१-१० ने नमवून अंतिम फेरीत विजय मिळविला. उपांत्य फेरीत दिप्ती बाथो ने राय क्लबच्या पौर्णिमा परातेचा १८-१, २५-१ ने आणि डिम्पल परातेने राय क्लबच्या अंजली प्रजापतीचा २०-१८, ४-२१, १८-७ ने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
प्रौढांच्या एकेरीमध्ये अंतिम फेरीत अकोला येथील फिरोज खान यांनी अकोला येथील एजाज खानचा २५-२०, १५-१९, १८-१२ ने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. उपांत्य फेरीत फिरोज खान यांनी एनकेएमच्या निशिकांत मेश्रामचा २५-१३, २५-१८ ने आणि एजाज खान यांनी स्टार कामठीच्या मोईन अख्तरचा १९-१०, १७-२५, २२-१३ ने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
विजेत्यांना माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे समन्वयक ॲड. संजय बालपांडे, माजी नगरसेविका सरला नायक, रमाकांत गुप्ता, मुख्य पंच एन.के. बक्षी, मनोहर वानखेडे आदी उपस्थित होते.