पाण्याच्या नियोजनासंदर्भात महापौर, आयुक्तांचे निर्देश : महापौरांनी मुंबईत घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
नागपूर शहरात सुमारे ३३ हजार अनियमित नळ कनेक्शन असून त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत आहे. नागपूर शहरावर भविष्यात असलेली दुष्काळाची छाया लक्षात घेता महापौर आणि आयुक्तांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. याअंतर्गत सोमवार २० मे पासून शहरातील अनियमित नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येत असून त्यासाठी कागदपत्रांच्या नियमातही शिथीलता आणण्यात आली आहे. दरम्यान, महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी (ता. १४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन नागपूर शहरातील पाण्याचे गांभीर्य सांगितले. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वास मुख्यमंत्र्यांनी दिले.
सोमवारी (ता. १३) महापौर कक्षात महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, , स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मिलिंद गणवीर, नगरसेवक भगवान मेंढे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे सीईओ श्री. संजय रॉय, एच.आर. व्यवस्थापक, के.एम.पी.सिंग, व्यवस्थापक (देखभाल व दुरुस्ती) कालरा, प्रवीण सरण उपस्थित होते.
नागपूर शहरात अनेक नळ कनेक्शन अनियमित आहे. कागदपत्रांच्या अटीमुळे ते नियमित करण्यात अडचणी येतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यावर सदर बैठकीत तोडगा काढण्यात आला. नागरिकांना आता केवळ एक शपथपत्र मनपाला द्यावे लागेल. सोबत आधार कार्ड आवश्यक असेल. याव्यतिरिक्त इलेक्ट्रिक बिल, निवडणूक ओळखपत्र, घर कर पावती यापैकी कुठलाही एक कागद द्यावा लागेल. ही विशेष मोहीम सोमवार २० मे पासून सुरू होणार असून नागरिकांनी आपले अनियमित नळ कनेक्शन नियमित करून घ्यावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.
-तर गुन्हा होईल दाखल
नागपूर महानगरपालिकेतर्फे नळ कनेक्शन नियमित करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन कनेक्शन नियमित करून घ्यावे. मनपाची चमू दहाही झोनमध्ये फिरून नागरिकांपर्यंत पोहचणार आहे. मात्र, यानंतरही कोणाकडे कनेक्शन अनियमित आढळून आले तर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात येईल, असेही यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
भविष्यासाठी नियोजन
सिंचन विभागातर्फे पेंच प्रकल्पातून सुमारे ७५ क्यूसेक्स पाणी कन्हान पाणी पुरवठा केंद्राला देण्यात येते. मात्र, पाणीपुरवठा केंद्रापर्यंत तेवढे पाणी येत नाही. पाच टक्के कमी पाणी गृहीत धरले जाते. मात्र, त्यापेक्षा अधिक टक्केवारीने पाणी कमी येते. ही गंभीर बाब असून त्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. इतकेच नव्हे तर हे पाणी पाईपलाईनने आणल्यास संपूर्ण पाणी मिळू शकते. यासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी जलप्रदाय विभागाला दिले. वेळोवेळी वीज जात असल्यामुळेही पाणी पुरवठ्यात मोठा अडसर निर्माण होतो. यासाठी आता ११ केव्हीए क्षमतेच्या नवीन एक्स्प्रेस फीडरचा प्रस्तावही तयार करण्यात आल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
मृत जलसाठा वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी
नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्याची पातळी कमी झाली आहे. जिवंत साठा जवळपास संपुष्टात आला आहे. केवळ १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे त्यापुढे मृत साठा वापरण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी प्रशासनातर्फे राज्य सरकारला पत्र पाठविण्यात आले होते. याच पत्राचा संदर्भ घेऊन महापौर नंदा जिचकार यांनीही मंगळवारी (ता. १४) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मृत साठा वापरण्याची परवानगी देण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली आहे. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत जलसाठा वापरण्यास मंजुरी दिली असून तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली.
मध्यप्रदेशातील चौराई धरणाचे पाणी सोडल्यास नागपूर शहराला काही प्रमाणात दिलासा मिळेल. त्यामुळे राज्य सरकारने मध्यप्रदेश सरकारशी संपर्क साधून चौराई धरणाचे पाणी सोडावे, अशी विनंतीही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

