Published On : Mon, Mar 5th, 2018

महिला मतदार वाढविण्यासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय महिला दिनी विशेष मोहीम

मुंबई: मतदार यादीत महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने आंतरराष्ट्रीय महिला दिन दि. 8 मार्च 2018 रोजी महिलांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसर दिनांक 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी दि. 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण 24 लाख 53 हजार 102 मतदार असून त्यामध्ये 13 हजार 46 हजार 904 पुरुष आणि 11 लाख 6 हजार 94 स्त्री मतदार आहेत. या यादीमधील आकडेवारीनुसार मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 1 हजार पुरुषांमागे 821 स्त्री मतदारांची नोंद आहे.

अद्याप नाव नोंदविले नाही अशा महिलांचे मतदार यादीत नाव नोंदवून यादीमध्ये महिलांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मुंबई शहर जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची व हळदी कुंकू आदी कार्यक्रमातून महिला मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. नव्याने मतदार यादीत नोंदणी केलेल्या स्त्री मतदारांना ओळखपत्राचे वाटपही यावेळी करण्यात येणार आहे.

मतदार यादीत नाव आहे अथवा नाही याची खात्री महिलांनी ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करावी. मुंबई शहरात सर्वसाधारण रहिवास असलेल्या व दि. 1 जानेवारी 2018 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या व अद्यापपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविले नाही अशा सर्व महिलांनी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा नमुना 6 भरुन जवळील विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात जमा करावे, असेही आवाहन श्रीमती मेहता यांनी केले आहे.