Published On : Fri, Mar 23rd, 2018

माणगाव कृषी अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे सभापतींचे निर्देश

Maha Assembly adjourned
मुंबई: माणगाव येथे कार्यरत असणारे उपविभागीय कृषी अधिकारी रामकृष्ण जगताप यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेत दिले.

आमदार सुनिल तटकरे यांनी विशेष उल्लेखाद्वारे जगताप यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करुन त्यांच्या कालावधीत होत असलेल्या जलयुक्त शिवार कार्यक्रमातंर्गतच्या अनियमिततेचे व भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले.

जलयुक्त शिवार योजनेतंर्गत काम करताना मर्जीतल्या कंत्राटदारांना ठेका मिळवून देणे, ई-टेंडरिंग असतानासुध्दा तांत्रिक पध्दतीने या ठेकेदारांना मदत करुन स्थानिकांना जलयुक्त शिवाराची कामे डावलल्याचा आरोप आमदार सुनिल तटकरे यांनी केला.

त्याचबरोबर प्रशासकीय कामांच्या अनेक तक्रारी असल्याने, कृषीविषयक विकासकामे करताना लोकप्रतिनिधींना विचारात न घेणे,अधिनस्त कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे, निकृष्ट दर्जाची कामे करणे, कंत्राटदाराबरोबर मदयप्राशन करणे इत्यादी गोष्टींचा उहापोह आमदार सुनिल तटकरे यांनी केल्यानंतर विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जगताप यांना सक्तीच्या रजेवर पाठवून जिल्हयाबाहेर बदली करण्याचे निर्देश शासनाला दिले.