नागपूर: महापालिकेच्या रुग्णालयांना उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी मंगळवारी अचानक भेट दिली. रुग्णालयातील स्वच्छता आणि व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्वच्छतेसोबत रुग्णालयांची रंगरंगोटी, डागडुजी करण्याचे निर्देश दिले.
उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी प्रयोगशाळा, ओपीडी, औषधालय, फिजिओथेरपी सेंटरे, एक्स-रे सेंटर, दंतचिकित्सा केंद्र, ईसीजी कक्ष तसेच टीबी नियंत्रण कक्ष व पंचकर्म विभागाचे निरीक्षण केले. तेथील भिंती बघितल्यानंतर त्यांनी दवाखान्याला रंगरंगोटी करण्याचे आणि खिडकीच्या काचा बसविण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर पाचपावली सूतिकागृहाची पाहणी केली. तेथे त्यांना सोनोग्राफी मशीन रेडिओलॉजिस्ट नसल्याने बंद पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ मशीन दुरुस्तीचे निर्देश दिले. रुग्णालयातील तुटलेल्या खुर्च्या हटविण्याचेही निर्देश दिले. पाणी व्यवस्था, स्वच्छतागृह व शौचालयाचेही उपायुक्त देवतळे यांनी निरीक्षण केले. कर्मचाऱ्यांच्या हजेरी रजिस्टरची पाहणी केली. रुग्णालयाच्या डागडुजी व रंगरंगोटीचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. बकूल पांडे उपस्थित होते.