Published On : Wed, May 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर आणि वर्धा शहरांत स्मार्ट मीटर्स बसविणे सुरु

नव्या तंत्रज्ञानाचे तसेच आर्थिक बचतीसोबतच विविध फायदे देणाऱ्या महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे आता नगपूर परिमंडलांतर्गत असलेल्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीजग्राहक देखील स्मार्ट होणार आहे. हे स्मार्ट वीजमीटर लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोफत बसविण्याचे नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास गेले आहे. नागपूर आणि वर्धा शहरातील महावितरणच्या कर्मचारी वसाहतींमध्ये ही स्मार्ट मीटर्स बसविण्यास सुरुवार झाली आहे.

स्मार्ट मीटर्स, गेट-वे, डाटा सेंटर यातील माहिती आदान-प्रदान करण्याच्या प्रक्रीयेची चाचणी झाल्यानंतर ही मीटर्स शहरासह संपुर्ण नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ही स्मार्ट मीटर्स बसविण्यात येणार आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सर्वच राज्यांच्या वीजग्राहकांकडे स्मार्ट प्रिपेड मीटर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील 2 कोटी 41 लाख वीजग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे. मात्र यातून फक्त कृषिपंपांच्या वीजजोडण्यांना वगळण्यात आले आहे.

Gold Rate
18 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,900 /-
Gold 22 KT ₹ 1,02,200 /-
Silver/Kg ₹ 1,26,500/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विजेच्या व नवीन वीजजोडण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी तसेच वितरण यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचे व विजेच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा ग्राहकांना अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर मोफत लावण्यात येत आहेत व नादुरुस्त झाल्यास ते मोफत बदलून देण्यात येणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांवर स्मार्ट मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड पडणार नाही. तसेच मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून निश्चित करण्यात आलेले वीजदर स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी लागू राहणार. विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल. त्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा, किती वीज वापरायची याचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचत करता येईल.

स्मार्ट प्रीपेड मीटर मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील. त्यानुसार वीजवापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे. स्मार्ट मीटरमधील रिचार्ज संपल्यानंतरही रात्री सहा ते सकाळी 10 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होणार नाही. तसेच रिचार्ज संपल्यानंतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणार नाही. हॅप्पी अवर्स असल्यामुळे सावर्जनिक सुटीच्या दिवशी किंवा रात्री-बेरात्री वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका नाही. हॅपी अवर्समध्ये वापरलेल्या विजेचे पैसे रिचार्ज केल्यानंतर कपात होणार आहे.

स्मार्ट मीटरचे रिचार्ज करण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइनचे सर्व पर्याय खुले राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात सध्या ज्या माध्यमातून वीजबिल भरणा होत आहे त्याच माध्यमातून स्मार्ट मीटर रिचार्ज करण्याची सुविधा पुढेही उपलब्ध राहणार आहे. तसेच स्मार्ट मीटरच्या विजेचा जमाखर्च हा प्रत्येक वीजग्राहकांसाठी मोबाईल ॲपद्वारे दैनंदिन स्वरुपात उपलब्ध राहील. तसेच रिचार्ज केल्यानंतर किंवा रिचार्जची रक्कम संपण्यापूर्वी मोबाईल ॲपवर आणि नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे सूचना येत राहील.

स्मार्ट मीटरमुळे सध्याच्या पारंपरिक मीटरचे रीडिंग घेणे, वीजबिल तयार करणे व वीजबिल वितरीत करणे बंद होणार. त्यामुळे मोबाईलसारखे रिचार्ज करा व आवश्यकतेनुसार वीज वापरा हा एकच बिलिंगचा विषय राहणार आहे. मानवी हस्तक्षेपामुळे सध्याच्या मीटरचे रीडिंग चुकीचे येणे किंवा सरासरी किंवा चुकीचे वीजबिल येणे, बील दुरुस्तीसाठी कार्यालयात जावे लागणे आदी ग्राहकांच्या मनस्तापाचे प्रकार नव्या तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे संपूर्णतः बंद होतील. स्मार्ट मीटरचे मासिक बिल वेबसाईट व मोबाईल ॲपवर उपलब्ध राहील. त्याची आवश्यकतेनुसार ग्राहकांना प्रिंट काढता येईल.

Advertisement
Advertisement