Published On : Sat, Aug 21st, 2021

स्वयंरोजगाराच्या प्रेरणेने कोव्हिड स्वयंसिद्धा होताहेत सक्षम

‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाद्वारे अनेक भगीनींना मिळाली संधी


नागपूर : कोरोनाचा क्रूर काळ काहीसा ओसरला असला तरी भूतकाळातल्या जखमांची धग अजूनही कायम आहे. अशात सर्वात मोठा प्रश्न उभा असतो तो उदरनिर्वाहाचा. ‘सोबत’ने पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून फाटलेल्या आभाळाला ढिगळं लावण्याचे आव्हान पेललं आहे. पालकत्व स्वीकारलेल्या २५० परिवारांपैकी दोनशेवर परिवारातील कर्ता पुरूषच गेल्याने सर्व जबाबदारी महिलांवर आली आहे. मुले, सासू-सासरे यासह घरातील अनेकांच्या जबाबदा-या खंबीरपणे सांभाळण्यास प्रत्येकच महिला सक्षम आहे. त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांच्या सक्षमीकरणाला बळ देण्यासाठी ‘सोबत’ मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातूनच यापैकी अनेक महिलांनी ‘सोबत’च्या माध्यमातून भरतकाम, विणकाम, शिवणकाम, खाद्यपदार्थ, सजावट, कलाकुसर अशा अनेक बाबींचे प्रशिक्षण घेतले. त्याचेच फलीत आज अनेक महिलांच्या समाधानाचे हास्य उमटत आहेत.

शनिवारी (ता.२१) रक्षाबंधनाच्या पूर्वसंधेला उत्तर अंबाझरी मार्गावरील प्रोफेसर राजेंद्रसिंह सायन्स एक्स्प्लोरेटरी येथील ‘सोबत’च्या कार्यालयामध्ये भगीनींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. ‘सोबत’च्या माध्यमातून मिळालेले प्रशिक्षण व काहींना आधीच अवगत असलेल्या कलांना छोटेखानी का होईना प्रारंभीक स्तरावर ‘सोबत’ने व्यासपीठ मिळवून दिले. त्याच माध्यमातून या भगीनींनी तयार केलेल्या वस्तू, पदार्थ, कलाकुसरीचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला भेट देणा-यांनीही या निर्मितीचे भरभरून कौतुक करीत हक्काने ते खरेदी करीत भगीनींना सहकार्य केले. आयुष्यभराच्या सोबतीची गाठ बांधून जन्मोजन्मीची साथ देण्याची शपथ घेणारा अर्ध्यावरच सोडून गेल्यानंतर अनेक भगीनींच्या आयुष्यामध्ये काळोख दाटून आला. हा काळोख दूर करून पुन्हा या भगीनींना काळावर पाय रोवून खंबीरपणे उभे करण्याच्या उद्देशाने माजी महापौर संदीप जोशी यांनी ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू केलेल्या प्रयत्नातून अनेकांच्या चेह-यावर हास्य फुलत आहेत. ऑटोचालक पती गेल्याने संसाराचा गाडा स्वत: ऑटो चालवूनच हाकणार असा स्वाभिमान दाखविणा-या भगीनीला ई-रिक्षा मिळवून देणे असो अथवा मुले आणि परिवारासाठी मोलकरणीचेही काम करण्याची तयारी दाखविणा-या भगीनीला ‘सोबत’च्याच कार्यालयाच्या स्वच्छता व देखरेखेची जबाबदारी देणे असो प्रत्येक भगीनी स्वत:च्या पायावर उभी राहून स्वयंसिद्धा ठरावी यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न संदीप जोशी यांच्या नेतृत्वात ‘सोबत’ची टिम करीत आहेत.


याच कार्याची परतफेड म्हणून शनिवारी २१ ऑगस्ट रोजी या सर्व भगीनींनी ‘सोबत’च्या प्रतिनिधींची ओवाळणी करीत त्यांना राखी बांधली. ‘सोबत’च्या वतीने या सर्व भगीनींना साडीचोळी देउन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी या सर्व भगीनींच्या निर्मितीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये कुणी महिलांची डिझायनर कुर्ती, गोधडी, सजावट केलेले दिवे, आरतीची डिझायनर थाळी, डिझायनर टेबलक्लॉथ, सौंदर्य प्रसाधने, मास्क, साबण, पिसलेले मसाले, कुंड्या, पाणीपुरी, पापड, कुरुड्या या व अशा अनेक वस्तू, पदार्थांचे स्टॉल लावले होते. आईने लावलेल्या स्टॉलला अनेक चिमुकल्यांनीही तेवढ्याच मेहनतीने हातभार लावला. आपल्या अंगातील कला आपल्याला सक्षम करू शकते, हा आत्मविश्वास या भगीनींमध्ये निर्माण करणे हा या प्रदर्शनीचा उद्देश होता. इतरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे इतरही महिलांचा विश्वास वाढला असून त्या सुद्धा आता प्रशिक्षण घेउन स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगतात.

‘सोबत’ प्रकल्प हे आपल्या हक्काचे ठिकाण आहे. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी येथे भगीनींसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. येथे आल्यानंतर परकेपणाची जाणीव होत नाही. आपल्यासारख्याच अनेक समदु:खी महिला भेटतात. पुढे काय करायचे याची कल्पना मिळते. एकूणच ‘सोबत’मध्ये आल्यानंतर माहेरी आल्याची भावना निर्माण होते. येथील सर्व भावंडे हे आपल्या माहेरची माणसं असल्यासारखेच वाटतात, अशी भावना अनेक भगीनींनी यावेळी व्यक्त केली.

…आणि बंद झालेला कॅटरींग व्यवसाय सुरू झाला
घरी कॅटरींगचा व्यवसाय पतीच्या या व्यवसायात पत्नीही नेहमी मदत करायची. कोरोनामध्ये पतीचा मृत्यू झाला आणि संकट कोसळले. कॅटरिंगच्या व्यवसायावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. आता हा व्यवसाय आपण एकट्याने करणे कठीणच अशी भावना भगीनीच्या मनात आली आणि तिने कॅटरींगचे सामान विकण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे असलेल्या सामानाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी त्या भगीनीने ‘सोबत’च्या भावंडांना त्याची माहिती दिली. ‘सोबत’च्या प्रतिनिधींनी याबद्दल संदीप जोशी यांनी माहिती देताच त्यांनी भगीनीची समजूत काढली. त्यांनी सामान विकण्याऐवजी हा व्यवसाय स्वत:च पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला. पहिले ऑर्डर म्हणून शनिवारी (ता.२१) झालेल्या कार्यक्रमाच्या जेवणाची जबाबदारी या भगीनीवर सोपविली. रक्षाबंधनाच्या पूर्वसंधेला भावाकडून बहिणीला मिळालेल्या खंबीर साथीने ही भगीनी भावूक झाली.

आत्महत्येचा प्रयत्न करणा-या भगीनीला केले परावृत्त
घरात आधीचीच गरीबी अशात कर्ता पतीच गेल्याने एक ना अनेक जबाबदा-या एकटीवर. अशात पैशाची चणचण. दोनवेळच्या जेवणाचीही आबाळ असताना पुढे जगायचे कसे हा प्रश्न अनेकदा त्रास द्यायचा. अशात चार दिवसांपूर्वीच ‘तिच्या’ मनात आत्महत्येचा विचार आला. त्यादृष्टीने तिने प्रयत्नही केले. याची माहिती मिळताच ‘सोबत’च्या समुपदेशक टिमद्वारे या भगीनीचे समुपदेशन करण्यात आले व तिला आवश्यक औषधेही देण्यात आली. उदरनिर्वाहासाठी लवकरच या भगीनीला आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.